असंतोषाचा ऊद्रेक होण्यापूर्वी लॉकडाऊन हटवा – गोविंद यादव

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31मार्च):-ऊद्या दिनांक १ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन परभणी जिल्हयात ५ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावरून समाजातील सर्वच घटकांमध्ये कमालीचा असंतोष दिसून येत आहे. या असंतोषाचा ऊद्रेक होण्याआधीच या लॉकडाऊन मधून कडक निर्बंधांसह अंशतः तरी सूट देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे.

लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर करताच सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. औरंगाबाद येथील घोषीत लॉकडाऊन स्थगीत करण्यात आले असल्याने परभणी जिल्हा प्रशासन लॉकडाऊन वाढवणार नाही, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरवत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन पाच तारखेपर्यंत वाढवण्याचा आदेश काढला.

यावरून समाजमाध्यमांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कडक निर्बंध लागू करून या लॉकडाऊन मधून किमान अंशतः तरी सूट देण्यात यावी, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली आहे. व्यापारी, शेतकरी, नागरीक यांच्या संतापाचा ऊद्रेक होण्यापूर्वीच हे लॉकडाऊन रद्द करावे, अशी मागणी यादव यांनी पालकमंत्री नवाब मलीक, जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर यांचेकडे केली आहे.