कोरोना’ नावाचा महाभयंकर रोग आपल्या देशात आला अन् त्यानं इथल्या, प्रत्येक माणसांच्या मनामध्ये गेली सात महिने राज्य केलं.

माणूस हा प्राणी खूपच शेफारला होता, नाव, पद, प्रतिष्ठा, धन – दौलत, साडी, माडी, गाडी यातच गुंतला होता. मॉडर्नतेच्या नावाखाली आपली सुशील संस्कृती विसरत चालला होता.

मिच श्रेष्ठ, ‘माझ्यासारखा या जगात दुसरा कुणीच नाही’ हा न्यूनगंड त्याच्या मनात घर करून बसला होता.

आपण हे आपलं आयुष्य का आणि कुणासाठी जगतोय हेच विसरुन चालला होता, आपलं कोण आणि परकं कोण याचीही त्याला भ्रांत नव्हती.

खऱ्या दुनियेत न जगता तो मोबाईल सारख्या वस्तूमध्येच आपलं जग पाहू लागला. कुठल्या जगात आपण वावरतोय हेही माहीत नव्हतं खरतर आपण म्हणतोय की देश विकसीत होतोय पण आपण कुठं भरकटतोय हेच समजत नव्हतं. नात्या-नात्यांमधला संवादच कमी होत चालला होता. बाप मुलाला तीन-तीन दिवस घरात दिसत नसायचा. आईला मोबाईल सोडून मुलाकडे आपल्या संसाराकडे पाहण्यात वेळच नसायचा. कोरोना खरचं तु माणसाला जगणं शिकवून गेला

मंदिर, मस्जिद, चर्च सर्वकाही बंद पडलं. जाती – धर्मात अडकलेल्यांना माणूस हि जात आणि माणुसकी हा धर्म समजून आला. त्याला डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांमध्येच देव दिसला खऱ्या अर्थानं माणूस जागा झाला.

कोरोना आला आणि सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांनाच एक चांगला धडा शिकवून गेला, खोट्या प्रतिष्ठेसाठी लढण्यापेक्षा आपल्यांसाठी जगणं शिकवून गेला. इंचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोट्यावधीची संपत्ती काय कामाची.

खऱ्या अर्थानं कोरोनानं माणसातला माणूस जागा केला.

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे,धुळे

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED