✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो. 9561551006

महाराष्ट्राचे दिवंगत मोठे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चारशे कोटीच्या स्मारकाच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राज्य कोरोनाच्या घे-यात आहे. गतवर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांचे आणि त्यांच्या अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडलेले आहे. आताही लॉकडाऊनच्या भितीने जन-मानस हवालदिल झाले आहे. अनेक लोकं लॉकडाईनच्या भितीनेच धडाधडा रडत आहेत. सामान्य माणूस मरणाच्या दाढेत आहे. कोरोना झपाट्याने वाढतो आहे. तो गरीब-श्रीमंत असा काहीच भेद करत नाही. गरीबांनाही होतो आहे आणि श्रीमंतांनाही होतो आहे. कोरोना बिलकुल भेद करत नाही पण इथली व्यवस्था भेद करते. सामान्य माणसाकडे पुरेसे पैसे नसतात. त्याला योग्य उपचार मिळत नाहीत.

सरकारी रूग्णालये आणि त्यांच्या व्यवस्थेलाच कँन्सर झालाय. ही व्यवस्था ब-यापैकी भ्रष्टाचाराने सडलेली आहे. अशा स्थितीत सामान्य माणसाला बेड, उपचार मिळत नाहीत. त्याची योग्य दखल घेतली जात नाही. गतवर्षी वेळेत उपचार आणि बेड न मिळाल्याने कित्येक लोकांचे जीव गेले. खासगी डॉक्टरांनी सुरीच लावली होती तर सरकारी हॉस्पिटलमधला सावळा गोंधळ, नसलेली शिस्त, भ्रष्टाचार व अनागोंदीमुळे सामान्य माणसाला योग्य उपचार भेटले नाहीत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना उपचार मिळाले. त्यांना बेडही मिळाले पण कित्येक गोरगरीब हॉस्पिटलच्या बाहेर मेले. ही महाराष्ट्र राज्याची आजची सत्य स्थिती आहे. अशा स्थितीत स्मारकासाठी चारशे कोटी खर्च करणे म्हणजे बाप कर्जात असताना यात्रेला जावून पैसे उडवण्यासारखे आहे. राज्याची अर्थव्यवस्था कशी आहे ? ते आम्ही उध्दवजींना सांगण्याची गरज नाही. सामान्य लोकांना त्याचे वीजबील भरणे मुष्कील झाले आहे, कर्जाचे हप्ते भागवणे जिकीरीचे झाले आहे. कित्येक घर मालकाचे, गाळा मालकाचे भाड्यावरून वाद सुरू आहेत. सावकारांनी लोकांना वेठीस धरले आहे. अशा काळात स्मारकावर पैसे उधळणे म्हणजे बेजबाबदारपणा आहे. उध्दव ठाकरेंसारख्या जबाबदार व संवेदनशील माणसाने असा बेजबाबदारपणा करणे योग्य नाही.

उध्दवजींनी बाळासाहेबांचे स्मारक जरूर बांधावे त्याला आमचा अजिबात विरोध नाही. बाळासाहेब केवळ उध्दवजींचीच नव्हे तर अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल संपुर्ण महाराष्ट्राला आस्था आहे. त्यांनी हयातभर सामान्य लोकांना केंद्रबिंदू माणून राजकारण केले. सामान्य माणसाच्या मदतीसाठीच शिवसैनिक आणि शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या. या शाखेवर लाखो लोकांचे प्रश्न सोडवले गेले. अडचणीतला माणूस शाखेवर जावून आपली गा-हाणी मांडत होता आणि स्वत:चे प्रश्न सोडवून घेत होता. सर्व-सामान्यांचा तोंडावळा असलेला शिवसेना हा एकमेव पक्ष होता. कॉंग्रेस भांडवलदारांची बटीक होती, राष्ट्रवादी साखर सम्राट-शिक्षण सम्राटांचा अड्डा तर भाजपा शेठजी आणि भटजींचा पक्ष होता. केवळ शिवसेना हाच सर्व सामान्यांचा पक्ष अशी प्रतिमा होती. सेनेत अठरा-पगड जाती-जमातीची लोकं होती. अठरा-पगड जाती-जमातीचे लोक तिथे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. सामान्य माणसांचा चेहरा असलेली शिवसेना त्यांचा आवाज ऐकतही होती आणि वेळप्रसंगी होतही होती. त्याच शिवसेनेने सामान्य माणूस अडचणीत असताना, राज्य आर्थिक अरिष्टात असताना स्मारकावर चारशे कोटी खर्च करावेत का ? बाळासाहेबांनी युतीचे सरकार आल्यावर सर्व सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत एक रूपयेत झुणका-भाकरीची व्यवस्था केली.

उपाशीपोटी झोपणा-या लाखो लोकांच्या पोटात चार घास जावेत अशी व्यवस्था त्यांनी केली. खरेतर झुणका-भाकर योजना सरकारला परवडत नव्हती, पण तरीही ती राबवली. कारण सरकार कुणासाठी आहे, कुणाचे आहे ? याचे पक्के भान बाळासाहेबांना होते. बाळासाहेब आज हयात असते तर त्यांनी चारशे कोटीचे स्मारक बांधण्याऐवजी हॉस्पिटल बांधले असते. निकडीचे काय, महत्वाचे काय ? याचे भान त्यांना होते. आयुष्यभर सामान्य लोकांचा आवाज व आधार झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मरणार्थ चारशे कोटीचे हॉस्पिटल बांधणेच उचित होईल. बाळासाहेबांनाही “लेसर शो” च्या झगमगाटापेक्षा लोकांची सेवा घडलेली आवडेल. गोर-गरिबांची सेवा झालेली आवडेल. उध्दवजींनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी चारशे कोटीचा चुराडा न करता एक सुसज्ज हॉस्पिटल उभारावे. त्याचेच स्मारक तयार करावे. तिथे सामान्य, गोर-गरीब लोकांच्यावर उपचार करावेत. तिथे लोकांचे जीव वाचतील, लोकांच्या वेदना दुर होतील. लोकांच्या जीवाला सुकून मिळेल.

तिथे येणारा प्रत्येक माणूस बाळासाहेबांना आणि उध्दवजींना ह्रदयात साठवेल. ख-या अर्थाने हेच बाळासाहेबांचे योग्य आणि उचित स्मारक असेल. त्यामुळे उध्दव ठाकरेंनी चुकीच्या मार्गाने जनतेच्या पैशाचा चुराडा करू नये. ते ही कोरोनाच्या कालखंडात. राज्य आणि जनता अडचणीत असताना. शिवसेना जा छत्रपती शिवरायांचा विचार मानते त्या शिवरायांनी उभ्या हयातीत कुठे स्वत:च्या नावाचे किंवा आत्मगौरवाचे सोहळे मांडले नाहीत, साजरे केले नाहीत. छत्रपतींनी साध्या दगडलाही कुठे स्वत:चे, वडीलांचे, आईचे किंवा मुलांचे नाव दिले नाही. एखाद्या गडाला, किल्ल्याला त्यांना स्वत:चे, वडीलांचे, आईचे किंवा मुलाचे नाव देता आले असते. त्याना त्यासाठी रोखणारे, जाब विचारणारे कुणीच नव्हते. पण त्यांचा स्वत:चाच विवेक जागा होता. हे राज्य रयतेचे आहे याची पक्की जाणिव त्यांना होती. छत्रपती शिवरायांनी कशालाही स्वत:चे नाव दिले नाही पण ते चिरंतन उरले. कर्तबगार माणसं त्यांच्या कर्तृत्वाने आणि विचाराने चिरंतन राहतात. त्यांची नावे कशाला द्या अगर न द्या. ते त्यांच्या कामानेच अजरामर होतात. अशी माणसं लोकांच्या ह्रदयात घर करून असतात. त्यांची स्मारकं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाची लेणी लोकांच्या ह्रदयात कोरलेली असतात. बाळासाहेब हे कर्तबगार होते. त्यांचे स्मारक बांधले किंवा नाही बांधले तरी ते चिरंतन उरतील. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची लेणी लोकांच्या मनात कोरलेली आहेत. त्यांच्या नावासाठी स्मारकाच्या उधळपट्टीची गरज आहे अशातला भाग नाही.

उध्दव ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र नाहीत तर ते प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत. प्रबोधनकारही त्यांच्या कर्तबगारीने, कार्यकर्तृत्वाने लोकांच्यात उरलेले आहेत. त्यांचे नाव वर्षानुवर्षे असेच राहिल. प्रबोधनकारांनी हयातभर देवळं-मंदिरं आणि मठांना विरोध केला. अलिकडच्या काळात बोकाळलेला स्मारक नावाचा प्रकारही या मठ-मंदिरात मोडणारा आहे. आजवर ज्यांची ज्यांची स्मारकं बांधली त्या स्मारकांची अवस्था काय आहे ? त्या स्मारकातून जन-कल्याणाचे काय झाले ? लोकांना तिथून काय प्रेरणा मिळाली ? किती लोक तिथे घडले ? नेमकं स्मारकांच्यामुळे काय परिवर्तन झाले आणि काय घडले-बिघडले ? याचा लेखाजोखा मांडायला हवा. आजवर उभारलेली स्मारकं आणि पुतळे धुळ खात पडले आहेत.

बहूतेक पुतळे चिमण्या-कावळ्यांनी घाण करून टाकले आहेत. जयंती आणि पुण्यतिथीशिवाय तिथे कुणी धुळ झाडायलाही जात नाही. मग नमस्कार दुरची गोष्ट. पुरोगामीत्वाची जीवंत मशाल असणा-या प्रबोधनकारांना नक्कीच हा अडचणीच्या काळातला पैशाचा चुराडा आवडला नसता. प्रबोधनकारच काय बाळासाहेबांनाही ते आवडले नसते. म्हणूनच मुखमंत्री उध्दव ठाकरे यांनी अडचणीच्या काळात स्मारकाच्या झगमगाटावर उधळपट्टी न करता बाळासाहेबांचे स्मारक म्हणून सुसज्ज आणि सर्व सोईनीयुक्त असे हॉस्पिटल उभारावे. तिथे सामान्य लोकांच्यावर उपचार करावेत, त्यांचे जीव वाचवावेत. जन-कल्याणासाठी उपयोगी पडणा-या व्यक्तीचे हेच खरे स्मारक होईल. बाळासाहेबांच्या आत्म्यालाही ख-या अर्थाने त्यांचा आनंद होईल.

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED