संचारबंदी काळात पत्रकारांना अडचणी येत असतील तर थेट संपर्क करा – डी.टी.आंबेगावे

29

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ येणार पत्रकारांच्या मदतीला धावून

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.15एप्रिल):- ‘ब्रेक दि चैन ‘ कोविड रूग्णांची साखळी तोडण्यासाठी दि.१४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध, संचारबंदी व १४४ कलम लागू करण्यात आले आहे. लाॅकडाऊन व संचारबंदी काळात फक्त अधिस्विकृतीधारक पत्रकारांनाच बातमी संकलनासाठी सवलत दिलेली आहे. म्हणजे फक्त ८% पत्रकारांना. इतर ९२% पत्रकारांनी पत्रकारिता करू नये असाच अर्थ काढायचा का? कोरोनाची साखळी खरचं तोडायची असेल तर महाराष्ट्रातील फक्त अधिस्विकृतीधारक पत्रकारचं नाही तर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मिडियातील पत्रकारांना लाॅकडाऊन व संचारबंदी काळात बातमी संकलन करण्यासाठी सवलत दिली पाहिजे.

याचा पाठपुरावा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. अधिस्विकृतीधारक पत्रकारांनाच सवलत व इतर पत्रकारांना सवलत नाही असा दुजाभाव केल्याने महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. कोविड १९ च्या काळात प्रिंट,इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मिडियाच्या पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घराघरात बातमी पोहोंचविण्याचे महत्वाचे कार्य केले आणि त्याच पत्रकारांना बातमी संकलनासाठी सवलत नाकारणे कितपत योग्य आहे?

महाराष्ट्रातील सर्व संपादक आणि पत्रकारांनी लाॅकडाऊन व संचारबंदी काळात कोविड १९, संचारबंदी व कलम १४४ चे सर्व नियमांचे पालन करावे, मास्क लावावा, शारिरीक अंतर ठेवावे, विनाकारण घराबाहेर फिरू नये, आय कार्ड गळ्यात ठेवावे पण पत्रकारिता करतांना काही अडचणी येत असतील, आपल्याला आरोग्य विषयक सुविधा मिळत नसतील, बेड उपलब्ध होत नसेल, ऑक्सिजन मिळत नसेल, बातमी संकलन करतांना विनाकारण कोणी त्रास देत असेल तर थेट 9270559092/ 7499177411 या व्हाटस्अॅपवर संपर्क साधावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी आवाहन केले आहे.