आदिवासी विकास (असो) संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने खावटी योजने संदर्भात धुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

28

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

धुळे(दि.20एप्रिल):- सोमवार दि. १९/४/२०२१ रोजी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, आंदोलन प्रमुख व वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभेचे नेते मा. आप्पासाहेब नामदेव येळवे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथे आदिवासी खावटी योजने संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
      महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संविधानात कोकणा, कातकरी, ठाकूर, कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार, पारधी अशा ४७ जमाती अनुसूचित जमाती आदिवासी साठी पात्र आहेत. यांना नाम सादृश्य म्हणण्याच्या अधिकार कोणत्याच आदिवासी मंत्र्यांना नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला नाही. या आदिवासींचे अनुदानाचे पैसे लाटण्याचे षड्यंत्र चालू आहे. म्हणून भिल्ल, तडवी, वळवी, गावित, मावची, पाडवी, वारली आशा ४७ आदिवासी जमाती जागृत झाले आहेत. आदिवासी लाभार्थ्यांचा खात्यावर खावटी अनुदान तात्काळ जमा करणे संदर्भात, संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना देणे संदर्भात सहाय्यक प्रकल्प अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.

    घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४७ आदिवासी जमातींना संविधानानुसार अधिकार दिलेले आहेत. तो अधिकार घेणे आदिवासींचा जन्मसिद्ध हक्क आहे . जर कोणी संविधानाचा अवमान केला तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. प्रत्‍येक आदिवासी कुटुंबाला ४००० रुपये खावटी अनुदान मिळालेच पाहिजे. एकही आदिवासी योजनेपासून वंचित राहायला नको. स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष झाले. आदिवासींचा विकास काही आदिवासी मंत्री व काही आदिवासी आमदार-खासदारांनी होऊ दिला नाही. जे आजही भूमिहीन आहेत, अशिक्षित आहेत, घरे सुद्धा नाहीत अशा ९०% आदिवासी जमाती कडे जातीचे दाखले व वैधता दाखले नाहीत. हे उघडे नागडे सत्य आहे.

त्यामुळे आदिवासींच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय विकास झाला नाही. आदिवासी जिथे होता तिथेच आहे. त्यांचा वापर फक्त मतदानासाठी केला गेला. पण भ्रष्टाचार करणाऱ्यांनो याद राखा आदिवासी आता खऱ्या अर्थाने जागा झाला आहे. खावटीच्या योजनेत बिलकुल भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत. अशी चर्चा करण्यात आली.
यावेळी अनुसूचित ठाकूर जमातीचे, आदिम संघटनेचे राज्य अध्यक्ष यशवंत (नाना) वसंतराव बागुल, प्रकाश हिरालाल भामरे समाजसेवक, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धुळे जिल्हा सल्लागार नितीन बोरसे, धुळे तालुका अध्यक्ष संदीप तवर, पृथ्वीराज शिरसाठ, विलास शिरसाठ सर, धुळे जिल्हा सल्लागार साहेबराव हिरामण वाकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.