बेरंग झाला कोरोना

31

कोविड-१९ (coronavirus disease 2019) या महामारीने अखिल विश्वाला जेरीस आणलं आहे. भारतामध्ये तब्बल एक वर्षापूर्वी प्रवेश करून त्याने मानवी समाजासह समाजधारणेस उपयुक्त तथा आवश्यक असणाऱ्या अनेक घटकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशाचा लगाम एकाएक मागे खेचल्यामुळे, सगळं कसं एकदम ठप्प झालं. त्याचेच परिणाम म्हणून अनेकांच्या जीवनाचा रंग बेरंग व्हायला सुरुवात झाली. तर काहींनी नैसर्गिक मानवी संकटांचा फायदा घेत आपले खिसे लालेलाल करून घेतले. त्यासंदर्भात एखादे उदाहरणच द्यायचे झाले तर, किराणा वानसामानाचे आवर्जून देता येईल. मागील वर्षीच्या टाळेबंदीच्या सुरुवातीला अनेक अफवांना बळी पडल्यामुळे जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली. तेव्हा मात्र काही अपवाद वगळता अनेकांनी लुटीची भूमीका पार पाडल्याचे दिसून आले.

त्याविषयी माझी फसवणूक करणारी एक चित्रफित मी जारी केली होती. एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किंमतीला मिळत होती. विरोध केल्यास घाऊक व्यापाऱ्याकडून तसे मिळते किंवा आमच्या मालाचा दर्जा उच्च असल्याचे कारण पुढे केले जात होते. आजही काहींच्या वागण्यात फरक दिसत नाही. यावरून सामान्य जनतेच्या लक्षात आले की, यासंदर्भात प्रभावी अशी संहिता किंवा नियमावली असणे गरजेचे आहे. कारण आहे ती व्यवस्था एक तर प्रभावी नसावी किंवा जनता त्यापासून अनभिज्ञ असावी.बेरंग कोरोनाने भारतामध्ये प्रवेश करताच काही असामाजिक तत्वांनी परिस्थितीचा दुरुपयोग करून त्याला हिरवा रंग देण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात का होईना पण त्या रंगाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करण्यात यश मिळाल्यामुळे एका विशिष्ट मानवी समूहाला सामान्य जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले.

त्यांच्याप्रती घृणात्मकता निर्माण करण्यासाठी काही दृकश्राव्य चित्रफितींचे संकलन करून, त्यांचे प्रसारण करण्यारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. परंतु कालांतराने हिरवा ओसरत जाऊन निळा होतो की काय? अशी शंका यायला लागली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला दिलेली हाक, ती म्हणजे ‘ शहराकडे चला ‘ त्या हाकेला ‘ओ ‘ देत अनेकांनी शहरं गाठली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना रोजगाराच्या विविध संधी मिळाल्या, शिक्षणाची सुलभता झाली आणि जातीयतेचे चटके कमी बसू लागले. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला प्रयाणकारी लोकांनी प्रगती साधून जीवनात चांगले स्थैर्य मिळवले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, मागील पाच दहा वर्षात गेलेल्या समाजाला शहरीकरणा सोबत हवे तसे साधर्म्य साधून तिथल्या भूमीत पाय पक्के करता आले नाही. त्यामुळे कुलूपबंद कोरोना काळात त्यांची मोठी हेळसांड झाली. ‘ गड्या आपला गावच बरा ‘ म्हणून अनेकांनी परतीची पाय वाट धरली.

शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून, गावी पोहोचल्यावर पुन्हा जातदांडग्यांच्या ठाकूराईला बळी पडावे लागले. आता कुठे कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध रंग धारण करू पाहणारा कोरोना बेरंग झाल्याचे दिसत आहे.बहुजन समाजाच्या उध्वस्त जीवनामध्ये रंग भरून त्यांचे जीवन सुखमय करणाऱ्या उद्धारक महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करून त्यांच्या जयंत्या आणि मयंत्या साजरा करत असतो. परंतु विनारंग आपल्या भावना व्यक्त करून अभिवादन करण्याचा मनाचा मोठेपणा व्यक्त करणाऱ्या अनुयायांचे मानावे तेवढे आभार थोडकेच!गेल्या काही वर्षांच्या तुलनेत महागाईच्या निर्देशांकाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. निश्चलनीकरण, वस्तू आणि सेवाकर, खनिज तेलाच्या आभाळाला भिडणार्‍या किमती तसेच अचानक लादलेली टाळेबंदी या तुघलकी निर्णयांमुळे आधीच बेरोजगार होऊन हातावर पोट असणाऱ्या लाखो लोकांचे कंबरडे मोडून त्यांना अपाहीज करण्याचा राज्यकर्त्यांचाच पुण्य प्रताप आहे, असे म्हटल्यास वावगे नसावे.

महागाईने जरी सर्वोच्च पातळी गाठली, तरी कोरोनापूर्व गटांगळ्या खाणारी अर्थव्यवस्था शुन्याकडे वाटचाल करण्याचे भाकीत फोल ठरवून तिने -२३.९४ (शून्याच्या कितीतरी खाली) ही ऐतिहासिक निम्न पातळी घातली गाठली. त्याचाच परिणाम म्हणून भूक बळीच्या ११७ देशांच्या तालीकेमध्ये भारत देश ५५ वरून १०५ वर पदोन्नत झाला. तरीही अनेक लोक राजकारणी तथा अध्यात्मिक भक्तीभावातून जागे होण्याचे नाव घेत नाही.
काही दिवसांपूर्वी शांत असलेल्या कोरोनाने आता पुन्हा डोके वर काढून रुद्रावतार धारण केलेला आहे. संपूर्ण देशामध्ये पावणेतीन ते तीन लाखांपर्यंत रुग्ण आढळत असून त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. ती संसर्गाची सर्वोच्च पातळी असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. म्हणून मानवी संपर्क व विषाणूंचा संसर्ग कमी होण्यासाठी टाळेबंदी करणे अत्यंत गरजेचे आहे. शासन-प्रशासन आपल्या परीने खूप प्रयत्न करत असून जनतेने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना हा रोगच नाही, असला तरी तो मानसिक आहे. तो फक्त गांडू लोकांनाच होतो. असे म्हणणारे भिडे गुरुजी आणि तत्सम बाष्कळांची आजही कमतरता नाही. तसेच जनतेच्या मरणाचे राजकारण करणारे राजकारणीही खूप अनुभवायला मिळत आहेत.

लोकांना दिलासा देऊन सुविधा पुरवण्याऐवजी, त्यांना वेठीस धरून आपली पोळी कशी शकली जाईल, अशा संधिसाधूंचा महापूर आलेला दिसतो. याला लोक भाषेत ‘ मुडदयाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ‘ असा जनमानसात रूढविचार आहे.सन १८९८ साली प्लेगच्या महामारीत सावित्रीबाई फुलेंनी गोरगरीब शोषित पीडित जनतेची मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपलेच प्राणार्पण केले होते. आज तेवढे अपेक्षित नसले तरी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन गरजूंना यथाशक्ती मदत करून मानव जातीला शोभनीय कार्य करणे प्रत्येकाला शक्‍य होऊ शकते. जे लोक संकटकाळी मानवी असहाय्यतेचा फायदा घेऊन आपली तुंबडी भरण्याचा प्रयत्न करतात, निसर्गनियमाप्रमाणे त्यांना त्यांच्या कर्माची फळं निश्चित चाखायला मिळतीलच यात तिळमात्र शंका नाही. कारण त्यासंदर्भात तथागत बुद्ध असे म्हणतात की, ” ज्याप्रमाणे बैलाच्या खुरांमागे गाडीचे चाक फिरत असते, त्याचप्रमाणे अकुशल कर्माचे फळ त्याचा पाठलाग करत असते.”

✒️लेखक:-भिमराव परघरमोल(व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा,तेल्हारा जि. अकोला)मो.९६०४०५६१०४