कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्याला यश सामान्य रुग्णालयास 20 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक उपलब्ध -दादाजी भुसे

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.28एप्रिल):- कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य प्रशासनास भेडसावणाऱ्या ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी येथील सामान्य रुग्णालयास पुर्वी 6 के.एल. क्षमते चा ऑक्सिजन टँक मंजूर करण्यात आला होता. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथील सामान्य रुग्णालयास दिलेल्या भेटीत येथील वाढती रुग्णसंख्या व गरजेप्रमाणे लागणारा ऑक्सिजन यामधील तफावत लक्षात घेवून 6 के.एल. एैवजी 20 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्याचे आश्वासन दिले होते.

त्या अनुषंगाने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासह आमदार मौलाना मुफ्ती यांनी 20 के.एल. चा ऑक्सिजन टँक लवकरात लवकर मिळावा यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजूरीसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून आज सामान्य रुग्णालयास 20 के.एल. (20 हजार लिटर) क्षमतेचा ऑक्सिजन टँक मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर डांगे यांनी दिली आहे.

नाशिक येथील डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी सर्व तांत्रीक बाबी तपासून आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल माहिती घेवून सदर टँकची सुविधा पुरविण्याबाबतच्या सुचना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. तर सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेला हा ऑक्सिजन टँक कार्यान्वित होण्यास 12 ते 15 दिवस लागणार असून लिक्वीड ऑक्सिजनव्दारे या टँकचे रिफील करण्यात येणार आहे. या ऑक्सिजन टँकच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयातील 200 बेड्सची ऑक्सिजन पाईपलाइनव्दारे जोडणी करण्यात येणार आहे. या टँकव्दारे 100 बेडसाठी किमान 6 ते 15 दिवस पुरेल इतक्या क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक असल्याने यामुळे वेळेसह वाहतुक व मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

याप्रसंगी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर डांगे, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ.हितेश महाले, डॉ.शिलवंत, डॉ.महेंद्र पाटील, डॉ.बरडे, रामा मिस्तरी, विनोद वाघ यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सामान्य रुग्णालयाची गरज ओळखून 20 के.एल. ऑक्सिजन टँक उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार कृषी मंत्री दादाजी भुसे व आमदार मौलाना मुफ्ती यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED