कळवण तालुक्यातील कनाशी शिवारात वीज कोसळल्याने शेतमजूराचे घरासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.28एप्रिल):- मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने महाराष्ट्रात ठिक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कळवण तालुक्यातील कनाशी परीसरात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. अचानक झालेल्या पाऊस व विजांचा फटका कनाशी येथील शेतमजूर बाळु पंढरीनाथ सोनवणे यांना बसला आहे. काल सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास कनाशी सह परीसरात विजा व मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

कनाशी शिवारात शेतमजुरी साठी पत्र्याचे झोपडे बांधून राहत असलेले सोनवणे यांच्या घरावर विज कोसळल्याने घरासह कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी सुदैवाने शेतमजूर मजुरीसाठी शेतात असल्याने कुठलीही जीवीत हानी झाली नाही, मात्र मजुरी करून पोटाला चिमटा देत जमवलेले पैसेही यात जळून खाक झाले असून संपूर्ण कुटुंब आज उघड्यावर पडले आहे. सदर घटनेची दखल घेत शासनाने माझ्या कुटूंबाला मदत करावी असे यावेळी सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले