महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा ! -मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

27

🔸आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.२८एप्रिल):-कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱयांना सेवा देताना प्रतिबंधात्मक साहित्यांअभावी व्यत्यय येऊ नये आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्ध पातळीवर संघर्ष सुरु आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र लढत आहेत. स्वतःहाची कुटुंबाची पर्वा नकरता सेवा आहेत. ही सेवा देताना त्यांच्याकडे पुरेसे प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असावे यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र (Oxygen concentrator), २७ ISO TANKS, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, १० लाख रेमडीसीवर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. आपल्या देशाला संकट नवीन नाही, या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी सांगितले.
*******