माणूसकीची ज्योत अखंड तेवत ठेवूया

55

सुमारे दीड वर्षापूर्वी मृत्युच्या भयावह डोंगरावर आपण उभे होतो तेथून आता कुठल्याही क्षणी आपला कडेलोट होईल की काय?अशा वळणावर आपण येवून पोहोचलो आहोत. मृत्यूचा खेळ पूर्वघडीला येत असतांनाच काही चुकीच्या धोरणांमुळे होत्याचं नव्हतं करुन गेला.कोरोना महामारीने सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे.कोरोनाने जवळजवळ बहुतांशी घरांचा उंबरठा केव्हाच ओलांडला आहे.कित्येकांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागत आहे.रुग्ण घेऊन धावणाऱ्या रुग्णवाहिका काळजात धडकी भरवतात.वयस्कांसोबत उमद्या तरुणांचं जाणं भयावह आहे.कोरोना घराचं घरपणं ओरबाडून….कित्येकांची आयुष्य रीतं करुन जातोय.जीवापाड जपलेल्या नात्यांची माणसे जातायत अन् अखेरची भेटही घेता येवू नये केवढं वेदनादायी आहे हे!चांगली चांगली माणसं जाताहेत ठसठसून भरलेल्या आठवणीचं भरगच्च पोत दूसऱ्यांना देवून!.काही ठिकाणी अख्खेच्या अख्खी कुटूंबे उद्ध्वस्त झालीत.कुणी कुणाचं सात्वंन करावं अशी परीस्थिती आहे.मन सुन्न,अश्रू कोरडेठाक…..निस्तब्ध शांतता जणू जगण्याचे निरागस हेतू अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

हे सर्व पहिल्यांदाच होतंय असं नक्कीच नाही.आजपर्यंतच्या मानवजातीच्या इतिहासाला हे नवं नाहीय.जात,धर्म,वंश यांपलिकडे जाऊन असंख्य संकटे येवूनही मानवजात तग धरुन आहे तर केवळ माणूसकीमुळे!माणूसकी दाखवणाऱ्या आशादायी प्रकाशाच्या किरणांनी आपल्याला आजवर जगवलंय.खरं तर माणूसकी कधीच पराभूत होवू शकत नाही कारण ती माणसाच्या आतील सतत प्रेरणा देणारी जिजीविषा असते.प्रत्येकाच्या ह्रदयात करुणा वास करत असतेच.आपल्या सहवेदनेच्या जाणीवा आधिक व्यापक,विस्तृत करण्याचा हाच खरा काळ आहे.जग्द्गुरु संत तुकाराम महाराज यांनी दुष्काळ पडल्यावर लोकांचे प्रचंड हाल पाहून चिंतन करुनआपल्या वाटणीतील सर्व कर्ज संपूर्णपणे माफ केले आणि गहाणखाते इंद्रायणीच्या डोहात बुडवली.आपल्या घरातील धान्याच्या कणग्या गरीबांसाठी खुल्या केल्या.आजघडीला देश संकटात असतांना मदतीसाठी रतन टाटा परत सज्ज झालेत.

“देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हातही घ्यावेत”
विं.दा.करंदीकरांच्या ओळींतून हे दातृत्वाचे हात आपण नक्कीच घेऊ.

अनेक जन वैयक्तिक ,सामुहिक पातळींवर शक्य ती मदत करतही आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्ययंत्रणेचे विशेषतः ग्रामीण भागातील वाभाडे काढले आहेत.कधी नव्हे तो आरोग्याचा मुलभूत प्रश्न ऐरणीवर आला आहे.तुटपुंज्या आरोग्य साधनांनी ही लढाई कदापी जिंकणे शाक्य नाही.केवळ यंत्रणेवर अवलंबून राहणे व उघड्या डोळ्यांनी किड्या-मुंग्यासारखी माणसे मरतांना बघणे हे संवेदनशील व्यक्तीला शक्यच नाही.आपल्या ह्र्दयातील मायेचा ओलावा रुक्ष होत असलेल्या ह्र्दयापर्यंत विविध प्रकारे पोहोचविता येतो.कुणी रुग्णांसाठी आॕक्सीजन,रेडमिसिवर मिळवण्यासाठी धडपडतोय.कुणी डबे वेळच्यावेळी देण्याचं काम करतंय.शहनवाज नावाच्या तरुणाने तर स्वतःची महागडी गाडी विकून लोकांना चार हजार आॕक्सिजन सिलेंडर पूरवलेत.कुणी होम क्वारंटाईन रुग्णांना भाजी,किराणा सामान,औषधे घरी आणून देत आहेत.एकमेकांना शक्य ती मदत करत राहू.

शरीराने अंतर राखायचे आहे मनाने नाही.आपल्या धीराच्या दोन शब्दांनी दुःखी मनाला नक्कीच ऊभारी मिळू शकते.कोरोना झालेल्या बऱ्याच जणांना खूप वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे.लोकांच्या कुत्सित नजरा निश्चितच आजारी असणाऱ्यांच मानसिक खच्चीकरण करतात.त्यामुळे शक्य तितकी काळजी घेऊन सहवेदना जागृत ठेवून सहानुभूतीपूर्ण वर्तन करु .कारण द्वेषयुक्त वागणूकीमूळेच अनेक जण आजार लपवत आहेत व परीणामी रुग्णसंख्याही वाढत आहे.यंदा शालेय परीक्षा झाल्या नसल्या तरी लोकांच्या मानसिकतेची परीक्षा नक्की झाली.जवळ म्हणून मिरवणाऱ्या लोकांचे बेगडी मुखवटे गळून पडले.कोण आपलं ,कोण परकं याचा न्यायनिवाडा झाला.जिथे आपली म्हणवणाऱ्या नात्यांनी नाके मुरडली तेथे मानवतेचे हे दूत धावून आले. माणूसकीचे हे नितळ झरे आपण जिवंत ठेवूया.सध्या कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण सुरु आहे.पण ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाबाबत उदासीनता आहे.त्यासाठी लोकप्रतीनिधींमार्फत प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे.काही ठिकाणी शिक्षक आपण समाजाचं देणं लागतो या भावनेने कोव्हीड सेंटरसाठी लाखोंचा निधी ऊभारत आहेत.

अत्यावश्यक औषधी,व्हेंटिलेटर,बेड घेऊन देत आहेत.आजच्या काळातील खरे देव डाॕक्टर,नर्सेस,सफाई कर्मचारी,पोलिस आपल्यासाठी दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करुन सेवा देत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने वर्गणीतून साडेसतरा लाखांचा निधी जमवून ६०आॕक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर महाराष्ट्रदिनी सेवेत रुजू झालेय.हे काम नक्कीच सर्वांसाठी दिपस्तंभासारखे आहे.भारतवासीयांचे दुःख बघून आॕस्ट्रेलियाच्या पॕट कमीन्स व ब्रु ली या उत्कृष्ट खेळाडूंनी भरघोस रकमेची मदत करुन आपल्या माणूसकीचे यथार्थ दर्शन घडवले आहे.अशा विविध पातळीवर निरपेक्षपणे काम करणाऱ्या सेवाव्रतींना मनापासून सलाम….या अफाट कामांतून स्फुर्ती घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आपल्या देखण्या हातांनाही बळ लाभो!

✒️लेखिका:-श्रीमती ज्योती थोटे-गुळवणे
(9850211943 )अंबड,जि.जालना
Jyotithotegulwane@gmail.com