राष्ट्रसंताचे भजनसाथी केशवराव म्हैसकर यांचे निधन

26

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.5मे):-चिमूर जवळचे मांगलगाव निवासी आणि अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक केशवराव म्हैसकर यांचे दीर्घ आजारामुळे मांगलगाव येथे निधन झाले.ते ७५ वर्षाचे होते.एकदा राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज मांगलगाव ( ता.चिमूर ) येथे कार्यक्रमासाठी आले असता चिमूर भागातील तत्कालीन ज्येष्ठ श्रीगुरूदेव प्रचारक अर्जुन आर्य भारतीय यांनी बाल केशवराव ची महाराजांना ओळख करून दिली होती. त्यावेळी केशवराव हे १४ वर्षाचे होते. वं. महाराजांच्या खंजेरी भजनांने प्रभावीत होऊन म्हैसकर यांनी ब्रम्हपुरी येथे आयोजित श्रीगुरूदेव प्रचार प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला.तेथे त्यांनी भजन गायन ,खंजेरी वादन आणि चटया विणण्याचे प्रशिक्षण घेतले होते. पुढे राष्ट्रसंताच्याच पावन उपस्थितीत खातगाव( अंतरगाव ) येथे केशवरावजींचा विवाह झाला होता. ते संयुक्त कुटूंबातच मोठे झाले.

त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. शेतजमीन अत्यल्प असल्याने ते घरी लव्हाळापासून चटया विणून गावोगावी विकायचे आणि कसाबसा आपला प्रपंच करायचे .
राष्ट्रसंताच्या शेवटच्या काही वर्षात त्यांंनी भजनसाथी म्हणून उत्तम सेवा दिली. खंजेरी वादन कला त्यांनी साध्य केली होती.महाराजांच्या पश्चात अर्जुन आर्य यांनी एक भजन टोळी तयार केली.आणि त्यात केशवरावजीला भजनप्रमुख केले होते. त्याकाळी अर्जुन आर्य हे गावोगावी प्रवचन करायचे तर भजनांचे सत्र केशवरावजी सांभाळायचे, अशा पध्दतीने चिमूर सिंदेवाही नागभीड झाडीपट्टी प्रातांत त्यांनी राष्ट्रसंताच्या मानवतावादी विचारांचा प्रचार प्रसार केला . अर्जुन आर्य च्या निर्वाणानंतर ते वैयक्तिकरित्या गावोगावी जाऊन सामुदायिक प्रार्थना , भजन कार्यक्रमास चालना देत असत.

घरची आर्थिक परिस्थिती नाजुक असूनही त्याचे कधीही दुःख न मानता राष्ट्रसंताचे महान सानिध्य आपल्या आयुष्यात मिळाले आहे, ही सर्वांत मोठी मला मिळालेली संपत्ती आहे, असे ते मानत असत. पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी पासून ते सदैव दूर राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगुरूदेव विचारांचेच चिंतन केले.”रख दुःख के संसारमें तब तो पुकारेंगे तुम्हे ” हेच मागणे केशवरावजींनी श्रीगुरूदेवांना मागले असावे.

एकंदरीत आपल्या भागातील श्रेष्ठ खंजेरीवादक आणि सच्चा श्रीगुरूदेव प्रचारक आम्ही त्यांच्या रूपात गमावलो आहे , अशी श्रध्दाजंलीपर संवेदना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आज आभासी पध्दतीने श्रध्दाजंली सभा घेण्यात आली. त्यात परिषदेचे सरचिटणिस ॲड. राजेंद्र जेनेकर , ग्रामगीता जीवन विकास परिक्षा बल्लारपूर तालुकाप्रमुख प्रा. श्रावण बानासुरे, माजरी शाखेचे संजिव पोडे, उर्जानगर शाखेचे देवराव कोंडेकर , मुठरा शाखेचे सदानंद बोबडे आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात.