सावत्र आईच्या खून प्रकरणात आरोपीस शिक्षा

34

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.8मे):-तीन एकर शेतातील हिस्से वाटणी वरून सावत्र आईचा खून केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षाची सक्तमजुरीच्या शिक्षासह सावत्र बहिणीस गंभीर जखमी केल्याबाबत पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस, बी, गावंडे यांनी दि,6 मे 21रोजी ठोठावण्याचा निर्णय सुनावला.पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण अंतर्गत येत असलेल्या मौजे शेलु खुर्द येथील रहिवासी असलेला आरोपी विठ्ठल नामदेव कांबळे यांचे व बेबीबाई कांबळे यांच्यात बेबीबाई यांचे पती यांच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीच्या वाटणीवरून वाद होत होते.

अशातच घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 12/ 10 /2014 रोजी मृतक बेबीबाई हिची मुलगी कुमारी मनीषा हिचा साखरपुडा असल्यामुळे खर्चासाठी त्यांनी शेतातील धु-यावरील आडजात झाडांची लाकडे विकण्याचा सौदा केला होता. तेव्हा दुपारी शेतात लाकडे तोडण्यासाठी मुलतानी लोक आले असता त्यांना झाडे दाखवण्यासाठी मृतक बेबीबाई व मनीषा ह्या शेतात गेल्या होत्या त्यावेळी मुलतानी लोक धु-यावरील आडजात झाडे तोडत होते मृतक बेबीबाई व मनीषा शेतात असून लाकडे तोडण्याचे काम चालू असल्याबाबत व बाजूच्या शेतातील माणसाने आरोपी विठ्ठल यास फोन केला.

असता विठ्ठल शेतात आला व लाकडे तोडण्याच्या कारणावरून बेबीबाई व मनीषा सोबत वाद करून त्यांना शिवीगाळ केली व तोडलेल्या लाकडा पैकी एका लिंबाच्या काठीने मनीषा हीच मारहाण केली व तिला सोडविण्यासाठी तिची आई बेबीबाई हिने प्रयत्न केला असता तिला सुद्धा काठीने डोक्यावर मारले व त्यामुळे ती बेशुद्ध होऊन शेतात मरण पावली या घटनेची माहिती गावात समजताच लोकांनी मनिषा हिस पुसद येथील सरकारी दवाखान्यात भरती केले व त्यानंतर तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले.

सदर घटनेचा रिपोर्ट मृतक बेबीबाई हिचा भाऊ दादाराव खंदारे यांनी पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण येथे दिला व त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी अपराध क्रमांक 312/ 2014 अनुसार आरोपी विठ्ठल कांबळे व त्यास सहकार्य करणाऱ्या त्याचा काका प्रभाकर बाबाराव कांबळे यांच्या विरुद्ध भादवि चे कलम 302, 307, 109 नुसार दोषारोप पत्र दाखल केले.
सदर प्रकरणांमध्ये विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय पूसद येथे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲडव अतुल वसंतराव चिद्दरवार यांनी एकंदर बारा साक्षीदार तपासले त्यामध्ये फिर्यादी दादाराव खंदारे व जखमी साक्षीदार मनीषा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सय्यद सत्तार, तपास अधिकारी तत्कालीन ठाणेदार अनिल कुरळकर, डॉक्टर मीनल भेलोंडे, डॉ जय नाईक यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

झालेला साक्ष पुरावा व दोन्ही पक्षांनी सादर केलेला युक्तिवादाअंती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गावंडे यांनी आरोपी विठ्ठल कांबळे यांचे विरुद्ध बेबीताई ला मारल्याप्रकरणी भादवि चे कलम 304 (पार्ट 2) कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व कुमारी मनीषा हिस मारहाण केल्याप्रकरणी भादवि चे कलम 326 प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी विठ्ठल यास पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी कोर्ट पैरवी म्हणून पोलीस काळबांडे यांनी सहकार्य केले. तर यातील दुसरा आरोपी प्रभाकर बाबाराव कांबळे यास निर्दोष सोडण्यात आले.