खावटी अनुदान तातडीने जमा करा

21

🔹शेतकरी संघटना व कोलाम विकास फाऊंडेशनची मागणी

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

राजुरा(दि.9मे):-राज्य शासनाने अनुसुचित जमातीच्या कुटूंबांकरिता जाहीर केलेली खावटी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने जमा करून गरजवंतांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार अँड. वामनराव चटप व कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केली आहे.सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा प्रकोप आता ग्रामीण भागातही पसरू लागला असून आदिवासी गुड्यांवर याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य शासनाने लावलेल्या लाँकडाऊनचा जबर फटका जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी वस्त्यांना बसला आहे.

काम धंद्यासाठी गावातून बाहेर पडणा-या आदिवासी बांधवांना आपल्या गावातच बंदिस्त होऊन बसावे लागले असल्याने त्यांचा रोजगार बुडालेला आहे. माणिकगड पहाडावरील कोलाम व जिल्ह्यातीन अन्य भागातीलही आदिवासी बांधवांकडून रोजगाराच्या संधी हीरावल्या गेल्या आहेत. कोरोनाच्या पहील्या लाटेतही आदिम कोलाम व अन्य आदिवासी कुटूंबांनी मोठा फटका सहन करावा लागला. सध्याच्या कोरोना प्रभावाने आदिवासी कुटूंब भयभीत झालेले असून, त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने समोर येण्याची गरज आहे. अशा कुटूंबांची तातडीने मदत करता यावी यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदानाच्या राशीची घोषणा केलेली आहे.

मात्र ही राशी अद्यापही आदिवासी बांधवांपर्यत पोहोचलेली नसल्याने आदिवासी कुटूंब हवालदिल झालेले आहेत. जिल्ह्यातील आदिवासी कुटूंबांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या हेतूने अप्पर आयुक्त नागपूर, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग चंद्रपूर व आदिवासी विकास महामंडळ यांना आदेश निर्गमीत करावेत अशी मागणी माजी आमदार अँड. वामनराव चटप व कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केली आहे.