वणा नदीवरील रेतीच्या अवैध चोरीची चौकशी करा अन्यथा जलसमाधी घेण्याचा इशारा

33

🔹वणा संवर्धन समितीचे निवेदन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.21मे):-येथील वणा नदीवरील धोबी घाट परिसरातील रेतीचा अवैध उपसा करून नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर वापरण्यात येत असल्याची चौकशी करावी अन्यथा वणा नदी संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष रुपेश लाजूरकर हे वणा नदीच्या(गाडगेबाबा यांच्या नाम समाधीच्या परिसरात) पात्रात कोणत्याही क्षणी जलसमाधी आंदोलन करतील असा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांना आज वणा नदी संवर्धन समितीचे मार्गदर्शक अनिलकुमार जवादे,सुनील डोंगरे,व रुपेश लाजूरकर यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

या नेत्यांनी दिलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, वणा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून नदीचे रूप विकृत होत चाललेले आहे.सोबतच शासनाचा महसूलाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे या मुळे वणा नदी संवर्धन समितीचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत.

या प्रकरणाची 24 तासात चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई न झाल्यास नदी संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष रूपेश लाजूरकर हे वणा नदीच्या पात्रात कोणत्याही क्षणानी जलसमाधी आंदोलन करतील व होणाऱ्या अनुचित प्रकारासाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून सर्वश्री रूपेश लाजुरकर,अनिल जवादे,सुनील डोंगरे,विक्की मेश्राम,तुषार हवाईकर,अशोक मोरे यांनी दिलेला आहे.