तथागत गौतम बुद्ध – अहिंसेचे पुजारी !

33

(तथागत भ.बुद्ध पौर्णिमा विशेष)

भगवान गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ज्ञानी, आध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते. त्यांनी बौद्ध धम्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक संमासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन होता. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा होय. राजा शुद्धोधन व पत्‍नी महाराणी महामाया यांच्या पोटी क्षत्रिय ईक्श्वाकु कुळामध्ये वैशाख पौर्णिमेस इ.स.पू.६२३मध्ये लुंबिनी येथे राजकुमार सिद्धार्थांचा जन्म झाला. तिलाच आज बौद्ध पौर्णिमा म्हटले जाते. आज त्यांच्या मंगलमय जयंती दिनी पावन चरणकमली कोटी कोटी नमन! कारण कविमहाशय आनंदाने गाऊन वंदन करतो – “शांती सुखे घेऊन आली ही वैशाखी पौर्णिमा! प्रथम नमु गौतमा, चला हो प्रथम नमु गौतमा!!”

सिद्धार्थांच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. या राजकुमारास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. त्यांचे यशोधरा या सुंदर-सुशील राजकन्येशी विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा पुत्र तथा संघमित्रा नावाची मुलगी झाली. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार गौतम बुद्धांना विष्णूच्या दशावतारातील नववा अवतार मानले गेले आहे. बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे – आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी. ही उपाधी त्यांनी स्व-प्रयत्‍नांनी मिळवली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी अर्थात ज्ञान प्राप्त करून स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध होय.

संमासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी म्हणजेच ज्ञान प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष-उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध होय. बौद्ध बांधव शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये ते सर्वश्रेष्ठ मानले जातात. त्यांच्या धम्माला वा तत्त्वज्ञानाला बौद्ध धम्म किंवा बुद्धिझम म्हणतात. त्यांच्या अनुयायांत दोन भाग पडतात – (१) बौद्ध भिक्खू-भिक्खूनी आणि (२) बौद्ध उपास-उपासिका हे होत. धम्माच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिस्ट म्हणतात. सर्व खंडांत बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध हाच मुख्य धम्म आहे. त्यातील जवळपास अर्धी – ४९ टक्के लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना लाभलेले आहे.

परंतु भारतातील कोट्यावधी दलित व हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्मसंस्थापक व तत्त्वज्ञ आहेत. वैशाखी पौर्णिमेलाच महात्मा बुद्धांचा (१) जन्म, (२) ज्ञानप्राप्ती व (३) महानिर्वाण झाले. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा या नावाने जगभर साजरी केली जाते. म्हणूनच कवीवर्य वर्णन करतात – “पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे। बोधिवृक्षाने कथन केले, चारित्र्य गौतमाचे।।”
मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते.

जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये भ.बुद्ध प्रथम स्थानी आहेत. त्यांच्याबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारतात वा जगात आजपर्यंत निर्माण झालाच नाही. शाक्यमुनी अर्थात शाक्यांचा मुनी हेही त्यांचेच दुसरे नाव. हा बौद्ध धम्माचा मुख्य स्तंभ होय. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानले जातात. जे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. भ.बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. ‘निसर्गावर प्रेम करा’ ही शिकवण आज कोरोनाच्या थैमानात अधिक हवी हवीशी सिद्ध होत आहे. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर त्या शिकवणी लेखी स्वरूपात प्रथम मांडल्या गेल्या.

त्यांचे सर्व तत्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहेत. स्त्री पथकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत ही बौद्ध धम्माची मूळ भूमी असली तरी भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर धम्म प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये हा धम्म खूप चांगल्या स्थितीत असलेला पाहायला मिळतो. मात्र एवढे सारे असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. तो म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो. कविराज बुद्धभूमीचे गुणगान करतात – “यह बुद्ध की धरती, युद्ध ना चाहे! चाहे अमन और शान्ति, यह बुद्ध की धरती!!” कारण त्यांची सत्य, अहिंसा, प्रेम, शांतीची मानवता, विश्वबंधुत्व आणि विश्वशांतीवर्धक शिकवण मानवकल्याणीच ठरत होती, आहे व भविष्यातही राहीलच, हे मात्र खरे!

!! भ.बुद्ध पौर्णिमा निमित्ताने पुरोगामी संदेश परिवारातर्फे सर्वांना बुद्धिवादी होण्यास हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी[संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.