कामगारांसोबत विश्वासघात करणाऱ्या मोहता इंडस्ट्रीजला मा.खा.पुगलिया यांच्या नेतृत्वात कायदेशीर लढाईतून वठणीवर आणू

29

🔹इंटक महासचिव आफताब खान यांचा इशारा !

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधि)

हिंगणघाट(दि.29मे):-मोहता इंडस्ट्रीजने दि २२ मे पासून १०० वर्षे जुन्या गिरणीला ताळेबंदी करण्याची नोटीस लावल्याने कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण झालेला असून मोहता व्यवस्थापनाच्या या अन्यायकारक वागणुकीला सर्वच कायदेशीर मार्गाने लढा लढून माजी खासदार व इंटकचे अध्यक्ष नरेश पुगलिया याच्या नेतृत्वात कामगारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास इंटकचे महसचिव आफताब खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला. मोहता इंडस्ट्रीजच्या या निर्णया विरूद्ध औद्योगिक न्यायालय नागपूर येथे इंटकने याचिका दाखल केली असून कोविडच्या काळात न्यायालय बंद असतांना सुद्धा हा गंभीर प्रश्न असल्याने ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून पुढील दि.१ जूनला यावर सुनावणी होणार आहे.

येथील कामगारांच्या अनेक पिढ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आणि त्याचा फायदा घेत मोहता परिवाराने एकाच्या चार गिरण्या निर्माण केल्या मात्र स्वतःच्या फायद्यासाठी या गिरणी व्यवस्थापकांनी इंटक,कामगार,न्यायालय,सरकारी यंत्रणा या सर्वांना फसवून टाळेबंदी करण्याचा घेतलेला निर्णय हा या शहरातील प्रत्येक श्रमजीवी मजुरांच्या घामाचा आणि गिरणीच्या प्रगतीसाठी त्यांनी आटविलेल्या रक्ताचा हा अपमान आहे. मात्र या गिरणीच्या एकही कामगारांची रोजीरोटी बुडू देणार नाही त्यासाठी शेवटल्या क्षणापर्यंत लढा देण्यात येईल असा इशारा इंटकचे महासचिव आफताब खान यांनी दिलेला आहे
येथील १२५ वर्षे जुन्या मोहता इंडस्ट्रीजने मोहता गिरणीच्या सूचना फलकावर दि.२२ मे रोजी मोहता गिरणीला कायमचे टाळे लावण्याची नोटीस लावली आणि या गिरणीत काम करणाऱ्या ५७० कामगारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

या गिरणीला १०० वर्षा पेक्षाही अधिकचा इतिहास असून या गिरणीत आजवर येथल्या कामगारांच्या चार पेक्षा अधिक पिढ्या खपल्या आहेत.अनेकांचे संसार या गिरणीमुळे फुलले आहे.कामगारांनी वेळोवेळी अनेक संकटावर मात करून या गिरणीच्या प्रगतीत आपला सिहांचा वाटा उचलला आहे.
सद्य स्थितीत या गिरणीत आर्थिक संकट निर्माण झाल्याचे चित्र मोहता व्यवस्थापना कडून निर्माण करण्यात येत आहे.परंतु या व्यवस्थापनाने या संदर्भात कधीही मान्यताप्राप्त युनियन इंटकचे अध्यक्ष मा.नरेशबाबू पुगलिया यांच्या सोबत यासंदर्भात चर्चा करून आपली भूमिका मांडली नाही.कामगार मात्र मागील पाच वर्षापासून व्यवस्थापकांचा अन्याय, अत्याचार झेलीत गिरणी सुरळीत सुरू चालविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

इंटकने वेळोवेळी कामगारांना केंद्रबिंदू ठेऊन मोहता व्यवस्थापणासोबत सौजन्याने प्रत्येक बाबींवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु टाळे बंदीची नोटीस गिरणीवर लावतांना गिरणी व्यवस्थापकांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता,कोणालाही विश्वासात न घेता गिरणीच्या ताळेबंदीची घोषणा करून कामगार,व इंटकचा विश्वासघात केलेला आहे.मोहता व्यवस्थापनाच्या या तुघलकी निर्णयाने इंटक डगमगणार नसून कामगारांनाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे इंटकचे महासचिव आफताब खान यांनी ठासून सांगीतले.या ताळेबंदीच्या निर्णयामुळे कामगारात संताप निर्माण झालेला असून या विरुद्ध इंटक सर्वच पातळीवर कामगारांच्या सोबत कायम राहणार असल्याचे आफताब खान यांनी सांगितले असून इंटकचे अध्यक्ष मा.खा.नरेशबाबू पुगलिया हे परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्याच नेतृत्वात असून सरकारी पातळी पासून तर कायदेशीर मार्गने लढा देऊन कामगार वर्गाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास आफताब खान यांनी व्यक्त केलेला आहे.