युद्धात सैनिकांचे नेतृत्वकर्ती राणी !

34

[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष]

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन दी ग्रेट, एलिझाबेथ व मार्गारेट म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी त्यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. त्या भारतातील माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जात. त्यांनी नर्मदातीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली होती. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स.१७६६ ते इ.स.१७९५पर्यंत माळव्यावर राज्य केले.

अहिल्यादेवींचा जन्म दि.३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेरावांना वधू म्हणून आणले. आता मल्हारराव होळकरांच्या त्या सून झाल्या होत्या. त्यांचे पती खंडेराव होळकर हे इ.स.१७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर सासरेही मृत्यू पावले. त्यानंतर त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या.

पुढे त्यांना तुकोजीराव होळकरांची सेनापती म्हणून नेमणूक मिळाली. त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून त्यांनी शेजारीच शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. त्यांना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. इ.स.१७६५मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता, हे दिसून येते. पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी, अशी पेशव्यांना विनंती केली.

शासन करण्यास त्यांना माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.पेशव्यांनी परवानगी दिल्यावर ज्या माणसाने अहिल्यादेवी होळकरांना विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन तुकोजीराव होळकर – मल्हाररावांचा दत्तक पुत्र यास सैन्याचा मुख्य केले. त्यांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उत्सुक असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती. तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर केले. हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते.

त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवींनी केलेल्या बांधकामांची यादी आहे – काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. त्यांना सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणतीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा त्यांनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद त्या सोडवू शकल्या नाहीत. तरीही त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा कर घेण्याचा अधिकार दिला. महेश्वर येथील त्यांची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना त्यांनी आश्रय दिला. कारागिरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी करवी माळवा व महाराष्ट्रात त्या काळी व आताही संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकाचे मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. राजकारणातील बारकावे व तत्व व्यावहारीक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. मल्हाररावांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या होत्या.
ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती, म्हटले तर नव्हतीच अशा खडतर काळात त्यांनी भारतातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली. आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्यकला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याचबरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले.

त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चीतच अभिमानास्पद आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून गाईंचे वाटप केले. असे मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले. मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकुन अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्याच ठिकाणी राहत असत. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री पंडीत, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यानाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या राजाश्रय देत असत. महेश्वर नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्याकाळी संस्कृती, विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती. ग्रंथ संपदा निर्मिती छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावे लागत होते. हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्येचे महत्त्व जाणत होत्या. त्यांच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून घेत. त्यांनी अशी विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.

या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा गैरसमज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत. असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही, हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने सन १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली, यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टीची प्रचीती आपणास येते. त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत. अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले. ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा निर्माण केला.अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. अशा या तत्वज्ञानी राणीसाहेबांचे महेश्वर येथे वृद्धापकाळाने दि.१३ ऑगस्ट १७९५ रोजी निधन झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या लोकोपयोगी कार्यांना व त्यांना जयंती दिनी त्रिवार वंदन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.[साहित्यिक व इतिहास अभ्यासक.]मु. श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.