” भाजीपाला भरपूर खावू, आरोग्य सुखी ठेवू “

39

जागतिक महासाथ असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे.कोरोना व त्यात आता लवकरच पावसाळा सुरु होत आहे.पावसाळ्यात सूर्यकिरणं प्रखर नसल्याने रोग होण्याची शक्यता अधिक असते.भूक न लागणे, सर्दी, खोकला, ताप, आम्लपित्त,जुलाब होणे, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार या काळात अधिक होतात.पावसाळ्यात मोजके आणि कमी खावे.पचायला हलका आहार घ्यावा. खाण्याचे पदार्थ स्वच्छ, ताजे व गरम असावेत.आहारात मिरी, सुंठ, आले, हिंग, कांदा, लसूण यासारख्या पदार्थांचा वापर अधिक करावा. आपण जो दररोज आहार घेत असतो, त्या आहारातूनच आपल्या शरीरास आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळत असतात.त्यातून आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. आजच्या विज्ञानानुसार रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते.

मानवी शरीरासाठी दैनंदिन आहारातून प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. शरीर प्रथिने साठवून ठेवत नाही. त्यामुळे ते दररोज घ्यावे लागतात. भाज्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे कार्य करतात. म्हणून आपण नियमित ताज्या हिरव्यागार भाज्या खाल्या पाहिजेत.

बहुतांश तरुणमंडळी हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्याचा कंटाळा करतात.आपल्या आहारामध्ये पालेभाज्या तसंच फळभाज्यांचा समावेश असावा, असे अन्नशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. जेणेकरून बदलत्या जीवनशैलीतही आपले आरोग्य निरोगी राहील. आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास मेंदूसह आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहते. प्राणघातक आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचे असेल तर नियमित भाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तरच तुमचे शरीर आजारांचा सामना करू शकते. उन्हाळ्याच्या वाढत्या दाहामुळे सर्दी, खोकला आणि व्हायरल तापाच्या त्रासासोबत घसादुखी, डोकेदुखी आणि पोटदुखीसारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते. कारण थंड पाणी तसंच पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण वाढते. यामुळेच ऋतूबदलानुसार आहाराच्या सवयींमध्येही बदल करणे गरजेचे असते.

आपल्याला फळांमधून जेवढी पोषकद्रव्यं मिळतात, तेवढीच पोषकद्रव्यं फळ भाज्यांमधूनही मिळतात. वांग, दुधी, पडवळ, घोसाळं, दोडका यांसारख्या फळभाज्या शरीराला पोषक तर असतातच, पण त्याचबरोबर त्या शरीराचं चापल्यही वाढवतात. कसलाही कंटाळा न करता, रोजच्या आहारात अशा अनेक फळभाज्यांचा समावेश केल्यास त्यातील शरीरोपयोगी जीवनसत्त्वं तसंच इतर घटकांमुळे विविध रोगांना प्रतिबंध करण्याचं आणि विषद्रव्यं शरीराबाहेर फेकण्याचं काम त्या करतात.निसर्ग आपल्याला असंख्य आहारीय पदार्थाचा ठेवा भरभरून देत असतो. फळभाज्या हा त्यातलाच एक भाग आहे. ज्या शरीराला व पर्यायानं आरोग्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयुक्त आहेत.

पालेभाज्यांचे आहारातील महत्व:-

आपल्या आहाराचे पिष्टमय, नत्रयुक्त, चरबी युक्त, क्षार, जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्वे गरजेची आहेतच पण आपल्या आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ’ जीवनसत्व, कबौंदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्व तर स्निग्ध पदार्थाच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्वाची गरज असते.शिवाय हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्व, रक्ताची घनता ठरावीक प्रमाणात ठेवण्यासाठी ‘के’ जीवनसत्व आणि या सर्वांना सावरणारे असे ‘क’ जीवनसत्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेच असते.ही सर्व जीनवसत्वांची गरज आपण विविध पालेभाज्यांमध्ये भागवू शकतो.पालेभाज्यांमध्ये विविध खनिज विपुल प्रमाणात असतात. पालेभाजीची उपयुक्तता वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे त्यात असलेला चोथा.या चोथ्यामुळे शरीरात घाण साठून राहत नाही.

आतडी कार्यक्षम राहतात.आतड्यातील आवश्यक जीवजंतूंची पैदासही या चोथ्यामुळेच होते.त्यामुळे आपण खालेल्या अन्नाच्या विविध घटकांचे अगदी शेवटपर्यंत नेऊन पचन करणे शरीराला सहज शक्य होते.शिवाय आतड्यात तयार होणारे पितासारखे विषमय पदार्थही या चोथ्यामुळे बाहेर टाकणे शक्य होते.अशाप्रकारे विविध पालेभाज्या आपल्या आहारात नित्य असणे गरजेचे आहे.

आयुर्वेदशास्त्रानुसार भाज्यांचे गुणधर्म:-

 

१) मेथी – वात व कफ दोषनाशक आहे.भुकेची इच्छा न होणे,मधुमेह,आमवात,ताप,स्थौल्य, सूज,वारंवार जुलाब होणे यात मेथीचा उपयोग होतो.मेथी मातेचे दूध वाढविणारी आहे.मेथीचे लाडू बाळंतपणानंतर खावेत.२) वांगे – वांग्याविषयी बराच मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे वातळ आहे.वास्तविक वांग्याने वातदोष वाढत नसून उलट दोषांचे शमन करते.पांढरे वांगे मूळव्याधनाशक आहे.३) पालक – ही थोडी पचायला जड असली,तरी मलप्रवृत्ती साफ करणारी आहे.नेहमी खाण्यास योग्य आहे.रक्त वाढविणारी भाजी म्हणून प्रसिद्ध आहे.लोहाचे प्रमाण भरपूर आहे.४) तांबडा भोपळा – शरीर बारीक असणे,लघवी साफ न होणे,सर्वांगाची आग होणे,त्वचाविकार यात उपयोगी ठरते.ज्यांना जाड व्हायचे आहे,त्यांनी भोपळ्यांच्या भाज्या खाव्यात.५) कांदा – सुका खोकला,रक्तपित्त,हृदय अशक्त असणे,लघवीला अडखळत होणे,शुक्राणूंची संख्या कमी असणे,,मासिकपाळीच्या वेळी पोटात दुखणे,संधिवात,कावीळ,सूज, मूळव्याध इ.अनेक आजारात कांद्याचा उपयोग होतो.

जखमेवर याचा लेप करतात.जखम बरी होण्यास मदत होते.मुकामार लागून येणाऱ्या सुजेवर लेप करतात.फिट आली तर कांदा फोडून नाकाजवळ धरतात.६) पडवळ – पचायला हलका,चवीला काहीसा कडू असून तिन्ही दोषकारक आहे.अजीर्ण,वारंवार तहान लागणे,पोटात जंत होणे,सूज येणे,अशक्तपणा यावर उपयोगी ठरतो.याने शौचास साफ होण्यास मदत होते.७) तोंडली – पचायला हलकी व दोषशामक आहे.हिचा जखमेवर लेप केल्यास सूज व वेदना कमी होतात.यकृतविकार,कावीळ, रक्तविकार,खोकला,दमा,मधुमेह या आजारांवर उपयोगी ठरते.परंतु,नेहमी खाऊ नये.८) दोडका – गाठी होणे,रक्त व त्वचारोग,प्लीहा व यकृत या अवयवांना सूज येणे,खोकला व दमा या आजारांवर उपयोगी.९) मुळा – कोवळा मुळा पचायला हलका असतो.मूतखडा असलेल्यांनी कोवळा मुळा अवश्य खावा.मासिकपाळीच्या वेळी योग्य प्रमाणात स्राव न होणे,यासाठी उपयोगी आहे.१०) कारले – पचायला हलके,चवीला कडू असून तिन्ही दोषांचे शमन करणारे आहे.हे जखमांची शुद्धी करणारे व जखमा भरून येण्यास मदत करणारे आहे.

याचा यकृतविकार,स्वादुपिंडाचे आजार,आमदोष,मूळव्याध, त्वचाविकार,स्थौल्य,विषबाधा इ.आजारांवर उपयोगी.रक्तातील साखरेचे प्रमाण कमी मदत होते.म्हणून,मधुमेही रुग्णांत विशेष उपयोगी आहे.११) शेवगा – ही भाजी वातनाशक आणि पित्तनाशक आहे.हृदय आणि रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारण्यास मदत होते.१२) अळू – याच्या पानांचा आणि दांड्यांचा रस जंतुनाशक आहे.त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखम लवकर भरून येते.याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होतो.१३) कोथिंबीर – उष्णता कमी करणारी,पित्तनाशक आहे.हृदरोगावर अतिशय उपयुक्त.१४) कडूलिंब- पित्तनाशक आणि कृमीनाशक म्हणून याचा उपयोग.१५) शेपू – वातनाशक आणि पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.१६) अंबाडी – मीरपूड आणि साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस सेवन केल्यास तो पित्त कमी होते.१७) हादगा – पित्त,हिवताप,खोकला कमी करणारी भाजी.ह्याच्या फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ पातळ होतो.

अशा अनेक विविध प्रकारच्या फळभाज्या आपल्याला निसर्गातून मिळतात.त्याचा आपण आपल्या निरोगी आयुष्यासाठी नियमित आहारात उपयोग केला पाहिजे.शेवटी अत्यंत महत्त्वाचे सांगतो ज्यांना काही आजार आहे त्यांनी फळभाज्या डाँक्टरांच्या सल्यानेच खाव्यात.यासाठी सांगतो आहे की,काही फळभाज्या काही आजारांना वर्ज आहेत.तेंव्हा कोरोना संकट जावू पर्यंत घरीच रहा…भाजीपाला घ्या मुखी,आरोग्य ठेवा सुखी.

✒️लेखक:-राजेंद्र लाड(लेखक,कवी)आष्टी,जि.बीड,मो.९४२३१७०८८५
मो.८६६८४७९१९२