बारावीची परीक्षा रद्द करण्याचा स्वागतार्ह निर्णय

27

सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डाने ने देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. कोरोना संकटाचा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला हा महत्वाचा निर्णय स्वागतार्ह आहे. २१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली होती. सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांशी तसेच देशातील शिक्षण तसेच आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करूनच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. १२ वि चा निकाल कसा लावायचा याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. देशावरील कोरोना महामारीचे संकट अजूनही कमी झालले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे.

देशात दररोज दीड लाख कोरोना बाधित रूग्णांची भर पडत आहे त्यात तरुण मुले व युवकांचे प्रमाण लाक्षणीय आहे अशावेळी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे. परिक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता असून अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन आम्ही धोक्यात घालू शकत नाही असे म्हटले आहे. पंतप्रधान महोदयांच्या या घोषणेनंतर या परिक्षेसंदर्भात संभ्रमात असलेल्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. विदयार्थ्यांची आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे त्याबाबत तडजोड होता कामा नये. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक चिंतेत आहे त्यांची चिंता मिटवली पाहिजे.

सध्याची परिस्थिती अत्यंत तणावाची आहे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणूनच सीबीएसई प्रमाणे राज्य राज्य सरकरनेही बारावीची परीक्षा रद्द करून राज्यातील विद्यार्थी पालक व शिक्षकांना दिलासा द्यावा.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५