राज्य आणि केंद्र सरकारने अर्धे टॅक्स कमी करून पेट्रोल डिझेल तीस रुपयांनी स्वस्त करावे – उमेश चव्हाण

39

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.2जून):-गेले वर्षभर नोकरी व्यवसाय सुरळीत नाही. सण – समारंभाच्या निमित्ताने करण्यात येणारे सिझनल व्यवसाय बंदच आहेत. लोक कर्जबाजारी होत आहेत. वीजबिल – प्रॉपर्टी टॅक्स कुठेच सवलत राहीली नसताना आता पेट्रोलने ओलांडलेली शंभरी आणि नव्वदपार झालेले डिझेलमुळे महागाई वाढून जगणे मुश्किल होणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेलवरील निम्मे टॅक्स कमी केले तरी इंधन तीस रुपयांनी स्वस्त होईल, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.

उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, गरीबाच्या घरची चटणी भाकरी सुद्धा आता या वाढलेल्या इंधनाच्या दराने महाग होणार आहे. सर्व महागाईचे मूळ हे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीशी निगडित असते, तरीही भाव नियंत्रण करण्याकडे केंद्र आणि राज्य दोन्हीचे उदासीन धोरण यामुळे नागरिक भरडले जात आहेत.
अन्न आणि धान्याला दळणवळण साठी रास्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे हाताला काम धंदा राहिला नसताना दोन वेळचे पोट भरणे अशक्य होतं असेल तर नागरिकांचा संताप अनावर होऊन त्याचा लवकरच उद्रेक बघायला मिळाला तर नवल वाटायला नको.

यापुढे मंत्र्यांनी सुरक्षेवरचा खर्च वाढवावा – लोकांनी मनावर घेतले तर आता मंत्र्यांना डिझेल – पेट्रोल दरवाढीचा कुठेही जाब विचारला जाऊ शकतो. शंभर रुपये लिटर पेट्रोल ही भाववाढ म्हणजे उच्चांकी ठरणारी आणि संताप वाढविणारी बाब आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मानसिकता दाखविली तर पेट्रोल डिझेल तीस रुपयांनी आणि पूर्ण टॅक्स माफ केला तर तब्बल साठ रुपयांनी स्वस्त होऊन अवघ्या चाळीस रुपयात एक लिटर मिळू शकेल, महागाई झपाट्याने कमी होऊन विकासदर वाढेल, हे लोकांना समजत आहे, म्हणून मंत्र्यांनी सुरक्षा वाढवावी असेही उमेश चव्हाण म्हणाले.