पर्यावरण संरक्षणासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे परळी नगर परिषदला निवेदन

32

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.6जून):-जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र विभागातर्फे ५ जून अंतरराष्ट्रीय पर्यावरण दिना निमित्त एक पर्यावरण संवर्धन सप्ताह ५ जून ते १२ जून या कालावधीत पाळण्यात येत असून *मानवतेचे दोन मिशन : आत्मपरीक्षण – पर्यावरण संरक्षण* या उद्गघोषणे अंतर्गत परळी नगर परिषदेस पर्यावरण संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले.

मान्सून पूर्व पावसाळा सुरू झाला असून यावर्षी १०१ % पावसाची शक्यता विविध हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.लोक covid-१९ मुळे हवालदील झालेले असून आता पुन्हा पावसाळी साथीच्या रोगांना तोंड देण्याची त्यांची मुळीच मानसिक तयारी नाही. शहरात डासांची संख्या वाढली आहे. अशात पुन्हा पावसाच्या पाण्याने नवीन डबकी तयार झाल्यास मोठ्या संख्येने डासांची पैदास होईल व त्या मुळे मलेरिया व डेंग्यू सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शहरातील सर्व वॉर्डात विशेष करून झोपडपट्टी विभागामध्ये असलेले खड्डे बुजवि्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रस्ते, नाले आणि गटारींची सफाई केल्यास घाणी मुळे होणारे अन्य साथिचेरोग होणार नाहीत.

शहरात ज्या ठिकाणी नळाच्या पाइपलाइन फुटलेल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त केल्यास अतिसार सारख्या आजाराला रोखता येईल. अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या नाल्यांमध्ये, गटारींमध्ये अडकल्याने नाल्या तुंबल्या जातात. मागचा अनुभव पाहता प्लास्टिक पिशव्यांच्या विल्हेवाटसाठी विशेष लक्ष द्यावे. वृक्षा रोपण विशेषतः शाळा, महाविद्यालये, मंदिर, मस्जिद यांसारख्या सार्वजनिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. तसेच या ठिकाणांची स्वच्छता प्राधान्याने तत्काळ करण्यात यावी अशी विनंती या निवेदनात जमाअत-ए-इस्लामी हिंद परळी शाखेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद परळी वैजनाथ यांना करण्यात आली.यावेळी जमाअत-ए-इस्लामी बीड जिल्हाध्यक्ष सय्यद इफ्तेखार, परळी शाखाचे सचिव सय्यद जाकेर व सय्यद सबाहत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.