ना.नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड़ानपुलाचे लोकार्पण

26

🔸आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळेच पुलाची निर्मिती..ना.नितीनजी गड़करी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१७ जून):-वर्धा जिल्ह्यातील अनेक विकास कामे रस्ते जवळपास पूर्ण होत असून वर्धा जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे ना. नितीनजी गडकरी यांनी सांगितले, आमदार समीर कुणावार यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे एम्स वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी दिले,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केंद्र सरकारच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
स्थानिक शिवाजी मार्केट यार्ड येथे आज या उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर,वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.पंकज भोयर,आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादारावजी केचे, विधान परिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड. सुधीर कोठारी,हिंगणघाट नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरीता गाखरे, जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे, माधव चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सौ.शारदा आंबटकर,समुद्रपुर प.स.सभापती सुरेखा टिपले,वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार इत्यादि मान्यवर व्यासपीठावर हजर होते.

राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव येथील उड्डाणपुलाचा शिलान्यास करुन ना.गडकरी हे दुपारी १.३० च्या सुमारास हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पोचले, त्यांनी नांदगाव चौक येथील सुमारे १.४२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले, या पुलाचे मूल्य ८५.२८ करोड आहे,दिल्ली येथील विद्या इंफ्रा या कंपनीने या पुलाचे बांधकाम केले आहे. स्थानिक आमदार कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे या पुलाची ना. गडकरी यांनी केंद्र सरकारतर्फे निधी देऊन मंजुर केला होता. सदर पुलाच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय महामार्ग पलीकडे राहणाऱ्या शहरी व ग्रामीण लोकांना मोठी सुविधा झाली आहे या रस्त्यावर ती अनेक अपघात झाले असून त्यासाठीच आमदार समीर कुणावर यांनी या पुलाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले होते.

आज लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नामदार गडकरी यांनीच
शेणापासून चांगल्या प्रकारचा डिस्टेम्पर पेंट तयार होत असून त्याचा उपयोग करून रंगरंगोटी करण्यासाठी पुलाची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारास आवाहन केले, आमदार समीर कुणावर यांनी वणा नदी खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला असता गडकरी यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, नागपूरच्या धर्तीवर नदीतुनही भविष्यकाळात वॉटर टॅक्सी सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना दिली.
राष्ट्रीय महामार्गावर झाडे लावून महामार्ग हिरवा करण्याचा सल्ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले, कोरोना काळात नागरिकांचे मनोबल वाढले पाहिजे यासाठी मी व्यक्तिशः आलो असून मोठ्या प्रमाणात लसीकरण तसेच सामाजिक दूरता मास्क वापर इत्यादी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत निरोगी राहण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल व उत्पादन निर्यात केले पाहिजे, हिंगणघाट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा इतरांनी असा माल निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी येथून रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी दिले शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी अनेक शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी केले तर महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निदेशक यवतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाचेवेळी भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, भूपेंद्र शहाणे,माजी जि.प.अध्यक्ष नितिन मडावी तसेच न.प.सदस्य भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ना.गडकरी यांनी सदर कार्यक्रमानंतर शहरातील पत्रकार मंगेश वणीकर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तसेच आमदार समिर कुणावार यांच्याही निवासस्थानी भेट दिली याप्रसंगी त्यांनी वणा नदी संवर्धन समितीचे निवेदन स्विकारले.हिंगणघाट नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या निवासस्थानीसुद्धा त्यांनी भेट दिली.