शेतकरी हाच अन्नदाता..…

    1507

    स्वतः शेतात उपाशी राबून देशाच्या प्रत्येक घरात, खानावळ तसेच सरकारी गोदामात अन्न पोहचवतो तो इतर कोणी नसुन आपला शेतकरी मित्रच होय. तो कोणाचा वडील असेल तर कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा असेल तर कोणाचा नातू. कोणाचा आजोबा असेल तर कोणाचा काका. असे विविध नात्यात गुंतून जसे आपण आहोत तसाच आपला सर्वांचा मित्र शेतकरी. त्याला घरदार आहे, कुटुंबात काही सदस्य आहेत एवढेच काय तर त्यालाही भावभावना आहेतच. पण एवढ्या साऱ्या मोहातून दूर राहून तो कष्ट करतो, शेती पिकवतो आणि साऱ्या जगाला धान्य पुरवून जगवतो. तो फक्त अन्नदाताच नाहीतर आपल्यासाठी प्राणदाता सुद्धा आहे; असे म्हटले तर यात कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. अन्न जर परब्रम्ह असेल तर त्याला पिकविणारा नक्कीच त्याच्यापेक्षा मोठा असेलच.…यात दुमत नाही.

    स्वतः कांदा मिरची खाणारा आपला शेतकरी मित्र आपण तुपासोबत जरी जेवलो तरी तो आपल्याला कधीच म्हणणार नाही की, “तू खातोयस त्या अन्नाला पिकवणारा मी आहे.” त्याला कुठला गर्व नाही आणि सन्मानाची त्याला आवश्यकता नाही. कारण त्याचा सन्मान पंढरीचा पांडुरंग त्याच्या सोबत राहून, रात्रंदिन शेतीची निगा राखुन करतो. त्याच्यासोबत साक्षात पांडुरंग असेल त्याला दुःख कोणत्या गोष्टीत असेल?
    तो आत्महत्या तरी करणार कशाला?आणि एवढी शेती पिकवूनही त्याच्याच घरी अठराविश्व दारिद्र्य का?

    असे अनेक प्रश्न समाजातील काही लोकांच्या मनात उपस्थित राहतात. पण त्यांना माहीत नाही की आत्महत्या करण्याची शेतकऱ्यावर का पाळी येते?. त्याला दुःख कोणत्या गोष्टीचा असेल आणि तो एवढी शेती पिकवतो तरी अठराविश्व दारिद्र्य त्याच्याच घरी का असेल. याचे एकमेव कारण म्हणजे एवढी मेहनत करूनही त्याने पिकविलेल्या पिकाला तो स्वतः इतर उद्योजकांसारखा भाव देऊ शकत नाही. त्याच्या मालाला भाव देणारा वेगळा, मालाची बोली लावणारा वेगळा आणि मनसोक्त भावात त्या मालाला विकत घेणारा वेगळा..…शेतकरी फक्त मालाची बोली ब लागत असतात मार्केट मध्ये फक्त एकटक आपल्या मालाला बघत बसतो.

    किती दयनीय अवस्था आहे आपल्या शेतकरी मित्राची..…त्याच्या स्वतःच्या मालाला योग्य त्या भावात तो विकुही शकत नाही. माल विकणाऱ्या अडत्याचे कमिशन, गाडीचा भाडा, माल उत्पादित करताना लागलेला खर्च, स्वतःची मेहनत आणि लोकांची उसनवारी वगळता शेतकरी मित्राच्या हाती काय येते याचा विचार कोणी करतो का?लेकरांचे शिक्षण, मुलगी लग्नाची झाली असेल तर तिची काळजी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा विविध समस्येला बिचाऱ्या शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते. त्यात आपल्याकडून त्याला आणखी समस्या येत असेल तर तो का आत्महत्या करणार नाही?

    तो दारिद्र्यात खचून का जाणार नाही, आणि तो दुःखी का होणार नाही?याचा जरा विचार करा आणि शेतकरी मोर्चा जर निघत असेल तर त्याला मनापासून आपला पाठिंबा राहू द्या. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू. हे अंतिम सत्य आहे.

    शेतकरी मित्र ज्यावेळी पक्क्या घरात राहील, ज्यावेळी त्यांच्या लेकरांना मोफत शिक्षण इच्छेप्रमाणे मिळेल, मुलीच्या लग्नाची जबाबदारी मिटू शकेल, कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल, पर्जन्यमान कमी असताना साहजिकच उत्पन्न कमी असेल त्यावेळी योग्य तो भाव पिकाला देण्यात येईल; त्यावेळी आपला शेतकरी खरा सुखी व समाधानी होईल. आपल्याला शेतकरी जगवतो तर आपली सुद्धा त्याच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यावर उपाय शोधून काढण्याची जबाबदारी आहे. खाल्लेल्या मिठाला जागा. कृतज्ञ बना कृतघ्न बनून राहू नका. कारण कृतघ्न असलेल्या व्यक्तीला एकवेळ शेतकरी माफ करेल पण निसर्ग करणारच नाही. म्हणूनच तर आज अवेळी काहीही होत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. वेळेवर जागा नाहीतर शेकतरी मित्राने जर शेती न पिकवण्याचे ठरवले तर आपण अन्नाविना जगू शकणार नाही. कागदी नोटा तर कोणी खाऊच शकणार नाही. चला तर मग मित्रहो आपण एक होऊ आणि आपल्या शेतकरी मित्राला त्याचा हक्क मिळवून देऊ.…शेवटी शेतकरी मित्र हा आपला अन्नदाताच आहे ना.…

    ✒️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी,ता.दारव्हा, जि.यवतमाळ(मो.८८०५८३६२०७)