मेहनतीला पर्याय मेहनतच….!

33

गेल्या महिन्यात मी सलग 2 – 3 दैनिकामध्ये काही युवक आत्महत्या करत असलेले पाहिले. ऐन तारुण्यात युवकांचे आत्महत्या करणे मी समजू शकलो नाही. त्यातले काही तर 25 वर्ष वय किंवा त्यापेक्षाही कमी वयाचे होते. एवढया लवकर नैराश्य का ग्रासत असेल बरं! या तरुण मंडळीना? मुख्यत्वे नोकरी न मिळणे हेच त्याचे कारण आहे? आता नोकरी म्हणजे सरकारी नोकरीच बरं! कारण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना इतक्यात कोणी भाव द्यायला तयार नाही. त्यांची नोकरी ही नोकरी नसून गुलामीच! बऱ्याच लोकांना असेच वाटते. असा विचार काय त्या सेवेत काम करणारी मुले – मुली नाही तर त्यांचे पालक, सर्वजण हाच विचार करत आहेत. नोकरी पाहिजे असेल तर सरकारी नोकरीच हवी. हीच भावना सध्या जोरात वाढीस लागली आहे.

एवढया मोठ्या भारत देशात सगळ्याच जणांना नोकरी मिळणे शक्य आहे का? ते पण सरकारी! खाजगी व सरकारी नोकरी पकडली तरी प्रत्येकाच्या हिश्याला ती येईल की नाही याची शक्यता अत्यन्त कमीच आहे. पण, काम सर्वांना मिळू शकते,हेही तितकेच खरे. अर्थात काम करणे म्हणजे एकमेकांच्या गरजा भागवणे होय. हे गरजा भागवत असताना स्वतः ला पण चार पैशांचा लाभ होत असतो. त्यातून तुम्ही स्वतः ची सोबत आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकता. माणसाला मोठे व्हायचे असेल तर ते छोट्या कामापासून सुरुवात करूननच मोठे होता येते.

पाणीपुरीचा गाडा चालवणारे, चहाची टपरी चालवणारे, छोटे हॉटेल चालवणारे, किराणा,भाजीपाला विकणारे हे सर्व व्यावसायिक त्यांच्या – त्यांच्या सोयीने काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मग त्यांकडे पाहून तुम्ही काम करायला का शिकत नाही? कोणतेही काम छोटे नसते म्हणायचे, आणि स्वतः ला ते काम करायची वेळ आली की मात्र करायचे नाही. हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरतेच नाही का?

नेहमी मोठं होण्यासाठी आदर्श काय आय.ए.एस. व आय.पी.एस. यांचाच घ्यावं का? अर्थात तसा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही. तो आदर्श जर तुम्ही ठेवत असाल तर तशी मेहनत घ्यायची पण तयारी ठेवा. उग मोठं-मोठे स्वप्न पहायचे आणि मेहनत घ्यायची वेळ आली की पळ काढायचा. ही सोयीची भूमिका आधी सोडून द्यायला पाहिजे. हे करणे जर आपल्याला होत नसेल तर आपल्याला जे जमेल ते करायला पाहिजे.

प्रत्येकाच्या अंगी काही न काही गुण हा असतोच. ज्यामुळे व्यक्ती हा इतरांपेक्षा अलग ओळखून पडतो. त्यामुळे कोणी गायक, कोणी चित्रकार, कोणी उत्कृष्ट वास्तू विशारद, कोणी संशोधक तर कोणी नेता होतो. प्रत्येकजण त्याच्या अंगी असणाऱ्या त्या वेगळ्या गुणांमुळेच प्रगती करून यशाचे फळ चाखत असतो. त्यामागे त्या- त्या व्यक्तींची मेहनत ही असतेच, पण त्याबरोबर त्यांची आवड व त्यांची क्षमताही असते. या मुख्य बाबीला विसरता येत नाही. त्यांना जे झेपेल ते काम त्यांनी केले. समाजाने उग सांगितलं म्हणून की हेच काम श्रेष्ठ आहे, आशा एकाच कामाच्या मागे ते लागले नाही. तसे झाले असते तर या व्यक्तींनी पण आत्महत्याच केली असती, नाही का?

पालकांनी आपल्या पाल्यांना व शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक म्हणजे काय हे केवळ पुस्तकी धडे देऊ नये. त्यांना या पुस्तकी भागासह प्रॅक्टिकली ज्ञान देण्याकडे भर द्यावा. जेणेकरून ही मुले आत्महत्या करण्याच्या मार्गाचा अवलंब करणार नाहीत. त्यांना पण कळेल की काम हे काम असते, ज्यातून आपल्या दैनिक व मूलभूत गरजा भागवणे हे महत्वाचे असते. ज्यामुळे त्यांच्या वाटचालीस निश्चित दिशा प्राप्त होईल.

स्पर्धा म्हणजे केवळ इतरांशी तुलनाच करणे नव्हे! स्पर्धा म्हणजे स्वतः शी झगडून व त्याप्रमाणे मेहनत घेऊन यश प्राप्ती करणे होय. एकच कॅडर प्रत्येकाला मिळणे हे स्पर्धा नाही, आणि ते निकोप स्पर्धेमध्ये समाविष्ट होऊ पण शकत नाही. त्यामुळे क्लासेस घेणाऱ्या लोकांनी पण इतरांच्या भावनेशी खेळणे सोडून द्यावे.(असे जे करत असतील त्यांच्यासाठीच हा सल्ला,इतरांनी मनावर घेऊ नये!) तुम्हाला जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे शक्य आहे ते पोहचवा; आणि त्या विद्यार्थ्यांना जे करता येईल तेवढीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवा. कारण तुम्हीपण कधी विद्यार्थी होता, आणि तुमचे पाल्ये पण विद्यार्थी असतील हे विसरून कसे चालणार, नाही का?

यशाचा मेवा चाखायचाच असेल तर मेहनतीची तयारी ठेवा, आणि हा मेवा आपल्याला लवकर चाखावा वाटत असेल तर तसे कदाचित शक्य नाही. लवकर मिळणारे यश हे तितकेच कुचकामी असते, आणि ते तुम्हाला यश वाटतच असेल तर त्यात समाधानी व्हायला शिका. उगाच शिपाई बनून नुसते कलेक्टर चे स्वप्न पहाणे मूर्खपणाच होईल. पण, त्यानुरूप मेहनत व चिकाटी असेल तर तुम्ही कलेक्टर काय भारताचे राष्ट्रपतीपण होऊ शकता.

माझ्या कवितेच्या काही ओळी,

उठा मुलांनो उठा! धावा, पळा!

घेतलेला वसा विजयाचा स्व- मेहनतीने उजळवा

मिळत नसेल फळ आपल्या कर्माचे..

निराश होऊ नका!

आज जरी नसले ते यश तुमचे..

चिकाटीने तुमच्या,

उद्याचे भविष्य तुमचे तुम्हीच घडवाल!

✒️लेखक- अमोल चंद्रशेखर भारती(लेखक,कवी,व्याख्याते,नांदेड )मो- 8806721206