शेतकरी कर्जबाजारी : आत्महत्या का न करी?

50

शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून आणि स्रियांच्या लागवड तंत्रातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जाते. मान्सूूनवर आधारित शेेती ही एक नैसर्गिक जीवनपद्धती आहे. शेतीत जो कष्टतो – राब राब राबतो तो शेतकरी असतो. शेतकरी हाही एक शेती धारण करणारा माणूसच असतो. हा एकप्रकारे ग्रामव्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणाच आहे. तो खेड्यांपाड्यांत राहतो. म्हणून खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा होय. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो वा कुळ, मिरासदार, बटाईदार असो! प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकांच्या उत्पादनावरून त्याची उपजीविका चालते. एवढेच नाही तर संपूर्ण विश्वातील मानवजात आणि जीवजंतूसुद्धा त्याने पिकविलेल्या अन्नधान्यांवर पोसले जात आहेत. म्हणून शेतकरीच आपला अन्नदाता होता, आहे व पुढेही राहिल, हेच खरे!

आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम सुपीक जमीन आणि नंतर पाणी लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे मनुष्यबळ, हे असले की तो शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा अर्थात भांडवल आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती बाजार पेठ आवश्यक असते. त्याच्यासाठी त्याची शेतीच सर्व काही म्हणजेच सर्वस्व असते म्हणणे वावगे ठरू नये. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे समस्त लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावरच अवलंबून असतात. मात्र शेती करताना त्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकार किंवा बँक आदींकडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून तो आपला शेतमाल तयार करतो, त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्याही असतेच, याची त्यांना थोडीफार कल्पना असावयास हवी.
आपला भारत कृषिप्रधान देश असला, तरीही आपले प्रशासन आणि सरकारचे निर्णय मात्र कृषिपूरक नाहीत; ते शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. देशात १९९५-२०१५ या काळात सुमारे तीन लाख अठरा हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग, उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न शेतमालाच्या विक्रीतून न निघणे आणि व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याच्या कारणाने वर्षाला सरासरी पंधरा हजारांहून अधिक आत्महत्या होतात. तो या दुष्टचक्रातून बाहेर पडणार नाही; कारण आपली सर्व यंत्रणा त्याच्याविरूद्ध आहे.

कर्जमाफीची मागणी झाली, की तात्काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या मोठ्या बँकाचे अध्यक्ष कर्जमाफीला विरोध करत अर्थशास्त्राचे दाखले देतात. शेतकरी आत्महत्या, उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात शेतमाल विक्री यांबाबत मात्र हे अर्थतज्ज्ञ मूग गिळून गप्प बसलेले असतात. अमेरिका, जपान, फ्रान्स या देशांत हंगामातील शेतमाल विक्री योग्य होण्यापूर्वीच त्यांची आधारभूत किंमत जाहीर केली जाते. भारतात केवळ आठ-दहा शेतमालांची आधारभूत किंमत जाहीर केली जाते. तीदेखील शेतकऱ्यांना मिळत नाही. फ्रान्समध्ये पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होताच पूर्ण शेतीवर आच्छादन टाकले जाते, एखाद्या किडीचा प्रादुर्भाव वाढला की हेलिकॉप्टरने औषध फवारणी केली जाते. आपल्याकडील अर्थव्यवस्था कृषी आधारित असूनही शेतीकडे दुर्लक्ष केले जाते. विकसित देश मोठ्या प्रमाणात शेतीला अनुदानही देतात. आपल्याकडे आजही बहुतेक शेतमाल उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीने विकावा लागतो. आपली बाजारपेठ जागतिक झाल्याचे सांगून जागतिक व्यापाराचे अनेक निकष लागू केले जातात. मग, प्रगत देशातील कृषी क्षेत्राचे निकष आपल्याकडे का लागू केले जात नाहीत? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की, तो चुकीचा आहे हे सांगणारे शहरी विचारवंत पुढे सरसावतात.

पण त्यांना हे माहीत नसते की, अमेरिकेत शेतीच्या एखाद्या कामाला आवश्यक तितक्या रकमेचे कर्ज दिले जाते. उदा. एखाद्या विहिरीसाठी जितका खर्च येत असेल तितकी रक्कम कर्जाऊ दिली जाते. आपल्याकडे एक लाख रुपये गरजेचे असतानाही ७०-८० हजार रुपयांचेच कर्ज दिले जाते. त्यामुळे उर्वरित रकमेसाठी तो खासगी सावकारांच्या दारात जातात. बहुदा हे सावकार राजकारण्यांनी पोसलेले असतात. एखाद्या नगदी पिकासाठी त्याने कर्ज घेतले असल्यास व ते पीकउत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकावे लागल्यास तो कर्ज कसे फेडणार?आपल्या अन्नदात्याचे गाय, बैल, म्हैस, रेडा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या, कोंबड्या, शेळ्या गांडूळ असे अनेक प्राणी हे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात, अशी एक गैरसमजूत आहे.

काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकांवर पडलेल्या किटक-जीवजंतूचा फडशा पाडतात. पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. ते निसर्गातील कीडनियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम करतात. ते पिकांचे नुकसान करतात, म्हणून अमेरिकेतील लोकांनी ‘कॅरोलविना पॅराकीट’ या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला होता. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या होत्या. हे येथे उल्लेखनीय!भारतातील शेतकरी हा जागतिकीकणानंतर आधुनिक शेतीकडे थोड्याफार प्रमणात वळला. त्याआधी तो पारंपारिक पद्धतीने शेती करत असे. तो शेतामध्ये शेंद्रिय खते वापरत असे. पारंपारिक शेतीमध्ये त्याला भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये पिकावरील रोगराई, पाण्याची टंचाई आदी समस्या भेडसावत असत. पण जागतिकीकरणानंतर भारतातील शेतकरी आधुनिक शेतीकडे हळूहळू वळू लागला आहे. मात्र आपल्याला आपल्या मनमानसात पक्की खुणगाठ बांधणे अत्यावश्यक आहे- “शेतकरीच आपला अन्नदाता! त्याच्या सहनशील व कष्टाळू स्वभावास माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम!!”

✒️एक शेतकरीपुत्र:-श्री कृष्णकुमार आनंदी गोविंदा निकोडे उर्फ निकोडे गुरूजी.[लेख विभागप्रमुख व जिल्हा प्रतिनिधी, डि. शै. दै.रयतेचा वाली व मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश.]मु. पो. ता. जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.