भक्तीने मृत्यू टळत नसतो

29

समस्त जीवजंतूंचे शरीर नाशिवंत व नश्वर आहे. तेच मरते, मात्र त्यास मरेपर्यंत हालचाल व चालते-बोलते ठेवणारी एक गुप्त शक्ती असते. तिलाच अध्यात्मशास्त्रात आत्मा म्हणतात. शरीरातून आत्मा निघून गेल्यावर शरीर निपचित पडते व जीव मृत्यू पावतो. काही वेळाने ते कुजू-सडू लागते. म्हणून त्याला नाशिवंत देह म्हटले आहे. ते नाश पावणारे असल्यामुळे ते इश्वर नाही, तर नश्वर आहे. सतर्क राहूनच खरी भक्ती साध्य होऊ शकते, असे युगदृष्टा सद्गुरूदेव हरदेवसिंहजी महाराजांनी सांगितले-

“भक्ति जागने को कहते भाग जाने को नही।
बच्चे पत्नी घर गृहस्थी को त्याग जाने को नही।
जिसकी भक्ति उसकी पूजा उसका ज्ञान जरुरी है।
कहे ‘हरदेव’ कि पहले ईश्वर की पहचान ज़रुरी है।”
[सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र.४१.]

सजीवाच्या देहात रममाण असणारा आत्मा व संपूर्ण सृष्टीचा निर्माता, चालक, मालक व नियंत्रक तो हा परमपिता परमात्मा आहे. आत्मा हा परमात्म्याचा सूक्ष्म अंश असतो. तो देहरूपात राहून अकर्म्य कर्म करतो म्हणून तो परमात्म्यापासून विलग-वेगळा असतो. त्याने जर सत्कर्म केले तर तो परमात्म्यात समावतो व परमात्माच होऊन जातो. उर्दूमध्ये फर्मावलं जातं, “इन्ना लिल्लाही व इन्ना इलैहि राजिऊन!” अर्थात- ‘आम्ही सर्व जण अल्लाहचे आहोत, त्याच्याकडेच आम्हाला परत जायचे आहे!’ जसे की परमात्मा हा विशाल सागरातील पाणी आहे आणि आत्मा म्हणजे चिल्लर घागरी वा भांड्यातील पाणी आहे, असे समजा. एखाद्या सत्पुरुषाने भांड्यातील पाणी समुद्रात ओतले तर ते पाणी वेगळे-विलग ओळखू येत नाही. तसेच या आत्मा व परमात्म्याचे गूज आहे. सद्गुरूदेव शिष्याला उपदेशात सांगतात-

“अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं प्रसिष्णु प्रभविष्णु च।।”
[सार्थ श्रीमद् भगवद्गीता : अध्याय १३वा : क्षेत्रक्षेत्रज्ञ योग : श्लोक क्र.१६.]

अर्थात- ‘हे नरा! हा परमात्मा सर्वत्र अखंड असूनही सर्व सजीवांच्या रुपात विभागल्यासारखा दिसतो. तो भूतमात्रांचा धारणपोषण करणारा, ग्रासणारा आणि उत्पत्तीही करणारा आहे, हे समजून घे.’ सांगा बरं, सत्कर्म कोणते? तर समर्थ सद्गुरूला समर्पित भावनेने शरण जाणे व त्याच्या आदेशा-उपदेशाप्रमाणे जनकल्याणार्थ आजीवन देह झिजविणे, हे होय. संत निरंकारी मिशनमध्ये तीन कर्म- १) सत्संग, २) सेवा व ३) सुमिरण हे पुण्यप्रद मानतात. याच सत्कर्मांना अध्यात्मात ‘इश्वरभक्ती’ म्हणून मान्यता मिळालेली आहे.

भक्ती हे मुक्ती मिळविण्याचे साधन अर्थात कष्टप्रद जन्म-मृत्यूच्या चक्रवातातून स्वतःची सुटका आत्म्याने शरीरात असतानाच समजपूर्वक करून घेण्याची परमेश्वर प्रणित युक्ती होय. भक्ती काही चिरंजीव वा अमर होऊन वर्षानुवर्षे जगण्यासाठी नसतेच. ती धन, धान्य, मुलेबाळे, सुंदर पत्नी मिळविणे, मेलेल्यांना जीवंत करणे किंवा शत्रूंचा शापाद्वारे तळपट बसविणे आदींसाठी अजिबात नसते. हल्ली संपूर्ण विश्वात सन २०२० पासून जीवघेण्या कोरोना विषाणूचा कहर माणसाला सळो कि पळो करून सोडत आहे. त्यामुळे स्वतःला विज्ञानवादी समजणारे नास्तिक बंधुभगिनी भक्ती, भक्त व भगवंत यांना आपले लक्ष्य करत आहेत. तथागत गौतम बुद्ध हेच आपल्या अरहंत भिक्खुंना कथन करतात-

“पठवीसमो नो विरुज्झति इन्दखीलूपमो तादि सुब्बतो|
रहदो व अपेतकद्दमो संसारा न भवन्ति तादिनो||”
[पवित्र धम्मपद : गाथा व अट्ठकथा-९५ : अरहन्त वग्गो- ७.९.]

अर्थात- ‘जो पृथ्वीप्रमाणे अकंप आहे. इंद्रकीलाप्रमाणे स्थिर आहे. उत्तम व्रतधारक आहे. चिखलरहित डोहाप्रमाणे निर्मळ आहे. असा सत्पुरुष सर्व बंधने नष्ट झाल्याने जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो.’ नाठाळांचे प्रश्न काहीसे असे असतात- जगात जोरदार भक्ती चालू असताना कोरोना महामारी का आली? अमूक मोठा भग्वदभक्त असूनही कोरानाग्रस्त का झाला व का मेला? जगात देव आहे, मग तो डरपोक तर नसेल ना? म्हणून तो महामारीस जगातून घालवू शकत नाही. तो जर सर्वशक्तिमान आहे तर कोरोना विषाणूचा शिरकाव झालाच कसा? मित्रहो, कोणतेही महासंकट हे त्या जगन्नियंत्या परमपित्याचीच कळानळा आहे, हे आपण कधी समजून घेऊ? जन्मास आलेला प्रत्येक जीवजंतू कधीतरी मरतोच. मात्र कधी मरणार? हे तो देवच जाने! महान ग्रंथकार शहंशहा अवतारसिंहजी महाराज भक्तिरहस्य व्यक्त करतात-

“भक्ति लोकीं अजे न समझे रब नूं पाणा भक्ति ए|
छड के सारे वहम भुलेखे गुरु रिझाणा भक्ति ए|
इक नूं मनणा इक नूं तकणा इक नूं पाणा भक्ति ए|
बाकी सारे कर्म छोड़ एह कर्म कमाणा भक्ति ए|
बेरंगा ए बेरुपा ए बाणी जो फ़रमाया ए|
कहे अवतार मैं हू-ब-हू ही रमे राम नूं पाया ए|”
[सम्पूर्ण अवतार बाणी : पद क्र.३०१.]

परमेश्वराच्या विलोभनीय सृष्टीसौंदर्याचे मानवाने धिंडवडे काढले. पर्यावरणाचा त्याने बेमुर्वत ऱ्हास आरंभिला आहे. वृक्षवेली, प्राणी, पक्षी, जीवजंतू हे त्याच्या उपद्व्यापाने अस्तित्वहीन होत चालले आहेत. पंचमहाभुते – आप, तेज, वायू, पृथ्वी व आकाश हे प्रदूषणाने दूषित होत आहेत. मग त्या सर्वेशाला ही चिंता व्यथीत करत नसेल काय? त्यालाही अंग झटकून अर्थात काहीतरी उपाययोजना करून हे लचांड लाथाडून लावावे, असे वाटले नसेल कशावरून? परमपिता परमात्मा हा निर्गुण व निराकार आहे. म्हणून तो स्वहस्ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे तो देहधारी जीवांकरवी अथवा पंचमहाभुतांद्वारे अशी भयंकर विनाशक परिस्थिती निर्माण करतो आणि सृष्टीचे गतवैभव पुन्हा स्थापित करत असतो. हे संत-भक्त मंडळी जाणतात. तसेच इतिहासासारखे शास्त्र, डोंगर, दरीखोरी, लेणी व खोदकाम या सर्वांच्या साक्षीने याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. मग या देहाचा व जन्माचा उद्धार कसा करायचा? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खड्या आवाजात सांगतात-

“भक्तिविना उद्धार नाही कुणाचा।
भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा।।
ऐका हा भाव जीवाचा जीवाचा।…”

जो भगवंत व भक्ती यांपासून विभक्त वा अलिप्त नसतो, तोच भक्त. जी कृती भगवंत व भक्त यांना दृढ सांधून ठेवते, ती भक्ती आणि जो भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला हृदयाशी कवटाळतो, तोच भगवंत समजावा. म्हणून मानवाने संत मताप्रमाणे भक्तीमय जीवन जगून आत्मकल्याणासह जगतकल्याण साध्य करावे. जीवन मुक्तीसाठीच भक्तिमार्ग आहे, हे पक्के ध्यानी ठसवावे. यास्तवच हा लेखप्रपंच सर्व वाचकांच्या चरणसेवेशी समर्पित!

✒️चरणधूळ:-कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ९४२३७१४८८३.