शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता

29

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.7जुलै):-जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यंदाही हवामान खात्याचा अंदाज भरकटलेला दिसून आला असून पावसाळ्यातला अख्खा महिना गेला असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही.
जेमतेम पावसावर जिल्हाभरात सोयाबीन, कापूससह अन्य पिकांचा ३५ टक्केपेक्षा जास्त पेरा झाला आहे. आता पावसाची प्रतीक्षा असून येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येत आहेत.

जून महिन्यात मान्सून जिल्ह्यात दाखल झाला. मान्सूनपुर्व पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन आणि कापसाच्या पेरण्या केल्या. पुढे मान्सूनचे तुरळक शिडकाव झाले, काही ठिकाणी मात्र एक ते दोन पाऊस मोठे झाले.

परंतु ३५ टक्केपेक्षा जास्त पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाला जिवदान देणारे पाऊस पडले नसल्याने आणि गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात पावसाचा थेंबही पडला नसल्याने जिल्ह्यातील ३५ टक्केपेक्षा जास्त पेरण्या करणार्‍या शेतकर्‍यांचे पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहेत.येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट येऊन ठेपण्याची शक्यता आहे.