बेलगाव पिंपळगाव येथे लग्नाला ५० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती- तहसीलदारांकडून मंगल कार्यालय मालकासह वधू-वर पित्यांना दंड

19

🔹लग्नाचा बार उघडल्यानंतर प्रशासनाचा दणका

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.14जुलै):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवित ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी जमवून विवाह सोहळा करणाऱ्यांंना गेवराईच्या प्रशासनाने चांगलाच दणका दिला. तालुक्यातील बोरी पिंपळगाव व बेलगाव या दोन गावांत लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन तहसीलदार सचिन खाडे यांनी बोरीपिंपळगाव येथे मंगल कार्यालय मालक, तर बेळगाव येथे वधू-वर पित्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड सुनावला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभासाठी निर्देशानुसार ५० लोकांची रितसर परवानगी आवश्यक आहे. असे असतानाही तालुक्यात हे निर्बंध पायदळी तुडवित लग्न समारंभ मोठ्या थाटात अधिक नातेवाईक व लोक जमवून पार पाडले जात आहेत.तालुक्यातील बोरीपिंपळगाव आणि बेलगाव येथे गर्दी जमवून लग्न समारंभ होत असल्याची माहिती मंगळवारी गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाली. त्यानुसार तहसीलदार खाडे यांनी बोरीपिंपळगाव येथील माऊली मंगल कार्यालयाची पाहणी केली असता, तेथे ५० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती. तसेच २० नागरिक हे विनामास्क उपस्थित असल्यामुळे शासनाने नेमून दिलेल्या कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यानुसार तहसीलदारांनी संबंधित मंगल कार्यालयचालकाला दहा हजाराचा दंड आकारला.

पाहुणेही विनामास्क

बेलगाव येथील दुसऱ्या कारवाईतदेखील अशीच परिस्थिती होती. त्यामुळे लग्नकार्यास ५० पेक्षा जास्त नागरिक जमा केले तसेच वीस नागरिक विनामास्क उपस्थित असल्याने शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दिगंबर एकनाथ पांढरे (रा. बेलगाव) व रामचंद्र नामदेव गिरे (रा. खामकरवाडी, ता. शिरूर) या वधू-वर पित्यांना दहा हजार रुपये दंड आकारला. दंडाची रक्कम ग्रामसेवक यांच्यामार्फत चलनाद्वारे शासनखाती जमा करण्याबाबत लेखी आदेश दिले आहेत.