सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री – ना.श्री.धनंजय मुंडे

37

जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री,तथा पालकमंत्री बीड जिल्हा,असा राजकीय प्रवास करणारे ना.श्री.धनंजय मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ रोजी झाला.त्यामुळे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो.
ना.श्री.धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्य पदापासून झाली.बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.भाजपमध्ये असतांना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते.त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेल्या ना.श्री.धनंजय मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला वेळोवेळी आपल्या आक्रमक भाषणांनी सळो की पळो केलेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या महत्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही दिले.त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद बीड,परळी नगर परिषद,परळी बाजार समिती अशा विविध स्तरावर सत्ता आहे.संत नागा जगमित्र सहकारी सुतगिरणीचे ते संस्थापक आहेत.त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरु केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे.ना.श्री.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय या विषयावर ना.श्री.धनंजय मुंडे यांच्या दृष्टिकोनातून शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी लिहिलेला लेख….
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.

या विभागाअंतर्गत ई-शिष्यवृत्ती विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,आम आदमी बीमा योजना,महाराष्ट्र राज्य अपंग,वित्त व विकास महामंडळ,इतर मागासवर्ग विकास महामंडळ,संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित आदी विभागाची विविध सामाजिक कामे केली जातात.
‘न्याय’ ही एक बहुआयामी संकल्पना आहे.मानवी समाजातील लोकांचे परस्पर संबंध हे हितकारक आणि प्रगतीला पूरक असावेत यासाठी लोकशाही राज्यव्यवस्थेत लोकांचे स्वातंत्र्य,त्यांचे हक्क,कर्तव्ये,जबाबदाऱ्या इत्यादींचे निकष ठरवले जातात.मग त्या निकषांवर आधारित नीतीनियम व कायदे राज्यसंस्थेने लागू करावेत,त्या कायद्यांचे पालन लोकांनी करणे हे बंधनकारक करावे,कायदे न पाळणे हा गुन्हा मानावा,आणि गुन्ह्यासाठी त्याच्या स्वरूपानुसार शिक्षा देण्याची तरतूद असावी,अशी न्याय या शब्दाची ओळख असते.

स्वातंत्र्य,समता,आणि परस्पर बंधुत्व ही न्यायाची अविभाज्य अंगे होत.समाजातील प्रत्येकाला समान स्वातंत्र्य व समान संधी उपलब्ध करून देणे,आणि योग्य संधीच्या अभावी वर्षानुवर्षे आर्थिक – सामाजिक उपेक्षेच्या संकटात सापडलेल्यांना झुकते माप देऊन त्यांना इतरजनांच्या पातळीवर आणणे,हेही न्यायाचेच एक द्योतक होय.असे नेहमीच माननारे सामाजिक न्याय मंत्री ना.श्री.धनंजय मुंडे आहेत.समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अंगभूत नैसर्गिक गुणांच्या आधारावर काही विविक्षित कामे करू शकते.समाजात नवनिर्मितीची प्रबळ इच्छा असणारा एक उत्पादक – वर्ग,अंगी साहस किंवा शौर्य असणारा एक लढाऊ – वर्ग,आणि बुद्धी व विवेक असणारा शासक – वर्ग,या तीन वर्गांचे लोक असतात.या साऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने,एकमेकांच्या कामांत हस्तक्षेप न करता आपापली कामे निष्ठेने करणे हेच न्यायाचे द्योतक होय.असे ना.श्री.धनंजय मुंडे मानतात.

सर्वांना समान स्वातंत्र्य देणे,आणि समाजातील विषमतेचे योग्य नियोजन करणे,या दोन गोष्टी न्यायासाठी आवश्यक असतात.सर्वांना केवळ समान संधी देऊन न्याय प्रस्थापित होईलच असे नाही.समान संधी मिळूनही एखादा वर्ग उपेक्षित राहात असेल तर त्याला थोडे झुकते माप देणे हे न्यायाचे ठरेल.असे ना.श्री.धनंजय मुंडे यांच्या कार्यावरुन लक्षात आल्याशिवाय रहात नाही.भारतात मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण हे याचे उत्तम उदाहरण होय.औद्योगीकरणाच्या प्रक्रियेतून समाजात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होत असते.भांडवलशाही व्यवस्थेकडून कष्टकरी कामगारांचे शोषण होत असते.अशा व्यवस्थेत श्रीमंतांसाठीचा न्याय हा गरिबांसाठी असणाऱ्या न्यायापेक्षा वेगळा असतो.

ही असमानता दूर करून सर्वांसाठी एकच न्याय प्रस्थापित करणे,म्हणजे सामाजिक न्यायाची बूज राखणे होय,असे ना.श्री.धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे.भारतात ऐतिहासिक काळापासून जात,धर्म,वंश,भाषा इत्यादींवरून होणाऱ्या भेदभावामुळे सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर होती.ती विषमता नष्ट करणे,आणि विषमतेमुळे मागे पडलेल्या घटकांना काही सवलती देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे,यास सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असे म्हणता येईल असे ना.श्री.मुंडे यांना नेहमीच वाटते.समाजातील कोणत्याही जातीच्या,धर्माच्या,किंवा वर्गाच्या व्यक्तीसाठी अन्न – वस्त्र – निवारा या मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देणे,त्यास विकासाची योग्य संधी देणे,सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्यांकडून दुर्बलांचे होणारे शोषण थांबवणे,आणि आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणे,ही सूत्रे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेत महत्वाची आहेत असे ना.मुंडे मानतात.

उपेक्षितांना समान संधी देण्यासोबतच सुरक्षा प्रदान करणे हेही गरजेचे असते.तणाव आणि भय यांपासून दुर्बलांना मुक्तता मिळवून देणे हे मुख्यत: राज्यसंस्थेचे काम असते.राज्यातील विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांच्या मूलभूत गरजा भागवणे,त्यांना समान संधी देणे,त्यांच्यात उद्भवणारे संघर्ष कमी वा नष्ट करणे,आणि समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे ही सामाजिक न्यायाची मुख्य उद्दिष्ट्ये होत.भारताच्या संविधानात समाविष्ट असलेली सामाजिक न्यायाची संकल्पना देखील समाजातील असंतुलन नष्ट करून कल्याणकारी राज्यास प्राधान्य देणारी आहे असे ना.श्री.धनंजय मुंडे यांचे मत आहे.

ना.श्री.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेतून दिव्यांगसाथी संकेतस्थळाची निर्मिती,शीघ्र निदान,शीघ्र उपचार उपक्रम,दिव्यांगांसाठी भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्याचा मानस,दिव्यांग अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ,दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग,कोरोना बाधित असल्यावचे उपचार व लसीकरण या ठिकाणी प्राधान्य,लाँकडाऊन काळात दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट,दिव्यांग कर्मचाऱ्यांना वर्क फ्राँम होम ची सुविधा,हालचाल न करु शकणाऱ्या दिव्यांगांना सुविधा,दिव्यांगांना रेशन व आरोग्यविषयक किट,भविष्यात राज्यात स्वतंत्र दिव्यांग विकास विभाग,तक्रार निवारण कक्ष,संजय गांधी निराधार,श्रावणबाळ यासह पाच योजनांसाठी निधी मंजूर,६०० रु.वरुन १०००रु.अनुदान वाढ,सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे बाबत शासन निर्णय आदी दिव्यांग हितार्थ निर्णय घेतलेले आहेत.

तेंव्हा महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास खऱ्याअर्थाने न्याय देण्याचे काम गोरगरीबांचे भाऊ अर्थात ना.श्री.धनंजय मुंडे हे रात्रंदिवस करत आहेत.त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा….!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड(मो.९४२३१७०८८५)जिल्हाध्यक्ष – शासनमान्य म.रा.दिव्यांग कर्मचारी संघटना बीड