शिक्षकांना देण्यात येणारी कोविड ड्युटी आणि गरोदर/स्तनदा मातांच्या प्रश्नाबाबत शिक्षक भारतीचे शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.16जुलै):-कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक अॉनलाईन पद्धतीने अध्यापनाचे कार्य करित आहेत.मात्र अजूनही शिक्षकांना कोविड ड्युटीसाठी घेण्यात येत आहे.कोविड ड्युटीवर असताना अॉनलाईन शिक्षण देणे शिक्षकांना शक्य होणार नाही.कारण ही ड्युटी दिवस,रात्र असते.साहजिकच शिक्षक भीतीदायक वातावरणात वावरत असतात.संबंधित शिक्षक १५/१५ दिवस सलग ड्युटी करतात.त्यांना घरी गेल्यावर विलगीकरणात राहणे क्रमप्राप्त आहे.कुटूंबियांना धोका संभवतो.त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि अॉनलाईन शिक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन शिक्षकांच्या कोविड ड्युटी रद्द कराव्या अशा मागणीचे पत्र आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले आहे.

गरोदर आणि स्तनदा माता असलेल्या महिला शिक्षकांना किमान दीड वर्ष लस घेता येणार नाही.त्यामुळे सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे धोकादायक आहे.दोन जीवांचा प्रश्न आहे.अशा सर्व शिक्षकांना वर्क फ्राम होमचा आदेश देण्याची मागणी कपिल पाटील यांनी पत्रातून केली आहे.५५ वर्षांवरील शिक्षक,ह्दयविकार,ब्लडप्रेशर आणि तत्सम आजाराने ग्रस्त शिक्षकांना कोविड ड्युटी देऊ नये अशी मागणी केल्याचे शिक्षक भारती विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, राजाराम घोडके, विलास फलके, विजय मिटपल्लीवार, रावन शेरकुरे, कैलास बोरकर, विरेनकुमार खोब्रागडे,क्रिष्णा बावणे,राजेश धोंगडे,सुनिल दुर्गे आदींनी एका पत्रकान्वये कळविले आहे.