दहावीत तालुक्यात प्रथम आलेल्या पूजा पाटील चा सन्मान..

19

🔸तुकोबांची गाथा देऊन पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने करण्यात आला सत्कार…

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.21जुलै): — येथील रहिवासी व भारतीय सेनेतील सेवानिवृत्त जवान विजय बाबुराव पाटील यांची सुकन्या पूजा विजय पाटील हिने इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९९.६०% गुण संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज गाथा व पुष्पगुच्छ देऊन या गुणवंत विद्यार्थांनीचा सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सा. दा. कुडे माध्यमिक व बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी पूजा विजय पाटील पाटील हिने ९९.६०% गुण संपादन करून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

खरं म्हणजे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. पूजा अगदी आधीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. इयत्ता ८ वी व ९ वी त देखील तिने प्रथम क्रमांक मिळविला होता. हीच यशाची परंपरा कायम ठेवत पूजाने इयत्ता १० वीत देखील तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. कोरोनाच्या कठीण कालावधीत अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले यात पूजा ची आई तिला कायमची सोडून निघून गेली. आज जर माझी आई राहिली असती तर तिला सर्वात जास्त आनंद झाला असता अशी भावना पूजाने व्यक्त केली. मातृछत्र हरवलेलं असलं तरी पूजा ने आपल्या यशातून स्वर्गीय आईला खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केलेली आहे. पूजा चे वडील विजय पाटील भारतीय सेनेत होते. पत्नी च्या निधनानंतर परिवाराला व मुलांना सांभाळून सध्या ते ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या वृत्तीप्रमाणे काम करत आहेत. समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्या वतीने कु. पूजा हिच्या समवेत तिचे वडील विजय पाटील व मोठे काका दिलीप पाटील यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पूजा ला तिच्या उज्वल भवितव्यासाठी व यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाचे (लहान माळी वाडा परिसर) अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, जेष्ठ संचालक चुडामण पाटील, माधवराव पाटील, मोहन (आण्णा) पाटील, राजेंद्र पाटील (महाले), कैलास पाटील, गणेश पाटील, परशुराम (आबा) पाटील, अशोक (आप्पा) पाटील, वाल्मिक (बंटी) पाटील, आनंद पाटील (पहेलवान), दिनेश (भैय्या) पाटील, जितेंद्र पाटील (महाराज), शिपाई अशोक झुंजारराव आदी उपस्थित होते.