डाॕ.चंद्रकांत लेनगुरे यांचा झाडीचा गोंदा झाडीबोली काव्यसंग्रह प्रकाशित

27

🔸झाडीपट्टी परिसर वैशिष्ट्यावर लेखन होणे गरजेचे – ॲड. लखनसिंह कटरे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.22जुलै):-झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. चंद्रकांत लेनगुरे यांचा झाडीचा गोंदा या झाडी काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डाॕ. अनिल चिताडे यांच्या हस्ते झाले.
परिश्रम भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे होते. प्रमुख भाष्यकार म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,गझलकार मिलिंद उमरे होते.सत्यसाई सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष मनिष समर्थ , कवी डाॕ. चंद्रकांत लेनगुरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हासचिव कमलेश झाडे यांनी केले तर काव्यसंग्रहाच्या लेखनप्रेरणेसंबंधात डाॕ. लेनगुरे यांनी विचार मांडले. उदघाटक डाॕ. चिताडे म्हणाले , महाराष्ट्राला साहित्यिकांची मोठी परंपरा लाभलेली आहे.त्यातल्यात्यात आपली झाडीपट्टी सुध्दा साहित्य आणि कला क्षेत्रांत पुढे आहे. मानवी जीवनात साहित्याला विशेष महत्त्व आहे म्हणून साहित्यलेखकांनी सकस साहित्य लेखन केले पाहिजे.गोंडवाना विद्यापीठात लवकरच झाडीबोली भाषाअध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असे ते म्हणाले .झाडीच्या गोंद्यातून धान पिकवणा-या शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्याचे ॲड. कटरे यांनी सांगून परिसर वैशिष्ट्ये लेखनाचा भाग होऊ द्या, असे आवाहन केले.

झाडीच्या गोंद्यातून झाडीवैभवाचे सुरेख वर्णनासोबत येथील अवनत स्थितीचे दर्शनही घडविण्यात कवी यशस्वी झाले आहे.नैतिक मूल्यावर आधारित मजबूत समाजरचना निर्माण व्हावी ही सामाजिक जाणिवेची आशयदृष्टी हा काव्यसंग्रह देतो ,असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले. बोलीमुळे भाषेतला जीवंतपणा कायम असतो म्हणून बोलीचे संवर्धन झाले पाहिजे,असे मत कवी मिलिंद उमरे यांनी मांडले.याप्रसंगी गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळातर्फे देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार मारोती आरेवार (उत्कृष्ट काव्यलेखन ),देविदास शेंडे (लोक कलावंत ) ,डाॕ.चंद्रकांत लेनगुरे (झाडीबोली काव्यलेखन) यांना प्रदान करण्यात आले. तसेच लखनसिंह कटरे यांच्या आगामी काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे विमोचन करण्यात आले.सूत्रसंचालन कवी प्रमोद बोरसरे यांनी केले तर आभार विलास निंबोरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींचे कविसंमेलन अरूण झगडकर यांचे अध्यक्षतेखाली प्रा.विनायक धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यात रामकृष्ण चनकापुरे , संतोषकुमार उईके,सुनिल पोटे, प्रशांत भंडारे, लक्ष्मण खोब्रागडे ,नंदकिशोर मसराम, सौ. संगिता ठलाल, प्रेमिला अलोणे, संजिव बोरकर , प्रमोद राऊत, उपेंद्र रोहनकर, पुरूषोत्तम ठाकरे ,वामनदादा गेडाम , विरेनकुमार खोब्रागडे आदींनी कविता प्रस्तुत केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ. निंबोरकर ,संजिव बोरकर,प्रमोद बोरसरे,जितेंद्र रायपुरे इत्यादिनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारोती आरेवार यांनी केले तर आभार सौ.मालती सेमले यांनी मानले.