सायळा वासीयांच्या मदतीसाठी विशेष मदत पथकाची स्थापना करा – गोविंद यादव

25

🔸अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला

🔹पंचनामे करण्याची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22जुलै):-दोन दिवसांपासून गंगाखेड तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच सायळा गावचा तालुक्याशी असलेला संपर्क पावसामुळे तुटला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या गावच्या मदतीसाठी आपत्कालीन विशेष मदत पथकाची स्थापना तातडीने करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे केली आहे.

मागील दोन दिवसांपासून गंगाखेड तालुक्यात ६० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जलमय शिवार झाल्या आहेत. त्यातच तालुक्यातील सायळा गावानजीकचा पुल पाण्याखाली गेल्याने गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे गावातील कोणी बाहेर पडू शकत नाही. तर बाहेरील कोणीही गावात प्रवेश करू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावच्या मदतीसाठी विशेष मदत पथकाची तातडीने स्थापना करून गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याची मागणी गोविंद यादव यांनी केली आहे.

या पावसामुळे तालुक्यांतील शेती पुर्णतः ऊध्वस्त झाली असून शेतकरी पुर्णतः ऊध्वस्त झाले आहेत. या परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथआमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर, ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांचेकडे करण्यात आली आहे.

*सायळा वासीयांच्या संपर्कात – गोविंद यादव *
संपर्क तुटल्याने भयभीत असलेल्या सायळा ग्रामस्थांच्या आपण संपर्कात असल्याची माहीती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे. या अनुषंगाने सायळा सोसायटीचे चेअरमन किशनराव सुर्यवंशी यांच्याशी संवाद सुरू असून आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती मदत गावाला पुरविण्यात येणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भाने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांचेशीही गोविंद यादव यांनी संपर्क साधत विशेष मदत पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे.