राज कुंद्राचा डर्टी पिक्चर

25

हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा वादग्रस्त पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याला क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली. राज कुंद्रा याने पॉर्न चित्रपटाची निर्मिती करून ते चित्रपट विशिष्ट एपवर अपलोड केले असून त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे असा त्याच्यावर आरोप आहे. राज कुंद्रा याच्यासह उमेश कामत व रियान थोर्प यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. उमेश कामत हा राज कुंद्रा याच्या कंपनीचा माजी कर्मचारी आहे तर रियान थोर्प हा राज कुंद्राच्या कंपनीचा विद्यमान वरिष्ठ अधिकारी आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून काहींनी त्याची बाजू घेतली असली तरी बहुतांश बॉलिवूडकरांनी या अटकेचे स्वागतही केले आहे. राज कुंद्रा याला पोलिसांनी पॉर्न चित्रपटाच्या निर्मितीसाठी आता अटक केली असली तरी तो गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर होता.

२०२० मध्येच त्याच्यावर या संदर्भात पहिला गुन्हा दाखल झाला होता यासंदर्भात त्याची फेब्रुवारीमध्येच चौकशी करण्यात आली होती. त्यालाही आपल्या अटकेची भीती होती म्हणूनच त्याने आपली अटक टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पोलीस खात्यातील व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने आपली अटक टाळण्याच्या प्रयत्न केला पण तो फोल ठरला. राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीचे लोक मुंबईतील एका भाडेपट्ट्यावर घेतलेल्या बंगल्यात पॉर्न फिल्म तयार करून ते विशिष्ट एपवर अपलोड करतात असा दावा फ्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा आहे. राज कुंद्रा, उमेश कामत आणि रायन थोर्प यांच्या विरोधात भरपूर पुरावे असल्याचा दावाही क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी केला आहे यावरून राज कुंद्रा या आरोपातून सहजासहजी सुटतील असे वाटत नाही. राज कुंद्रा याची ओळख शिल्पा शेट्टी हिचा पती असा असला तरी तो तो प्रख्यात उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो कोटींच्या मालमत्तेचा मालक असलेल्या राज कुंद्रा याची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.

शिवाय राजस्थान रॉयल या आयपीएल संघाचाही तो सहमालक आहे. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक होता होता तो वाचला होता. त्यावेळेसच त्याला अटक होणार होती पण पोलिसांकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे नव्हते. २०१५ साली सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने क्रिकेटमधील कोणत्याही प्रकारात भाग घेण्यास त्याला आजीवन बंदी घातली होती. २०१९ मध्ये गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या रियल स्टेट विक्री प्रकरणी इडीने त्याची चौकशी केली होती. हा मनी लॉंडरिंगचा भाग होता व मिर्ची याच्या व्यवहाराशी कुंद्रा याचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. एकूणच राज कुंद्रा याला आता अटक झाली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस त्याच्या पाळतीवर होते. सतत कोणत्या ना कोणत्या अनैतिक कृत्यात त्याच्या सहभाग होता पण कधी पुरेशा पुरव्या अभावी तर कधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे त्याला अटक होत नव्हती पण यावेळी मात्र तो पोलिसांच्या चांगल्याच कचाट्यात सापडला आहे.

वास्तविक अशी दुष्कृत्ये करण्याची त्याला काहीही गरज नव्हती त्याच्याकडे सारे काही होते. नाव, पैसा, इज्जत कोणत्याच गोष्टीची त्याच्याकडे कमतरता नव्हती पण म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी. कदाचित पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आणि आरामात सुटू शकतो असे त्याला वाटत असावे म्हणूनच त्याला ही दुर्बुद्धी सुचली असावी. याच दुर्बुद्धी ने त्याचा घात केला. नाव, पैसा, इज्जत तर गेलीच पण आता कायमचे तुरुंगात बसायची वेळ आली. राज कुंद्रा याच्या डर्टी पिक्चरचा अशा प्रकारे दि एन्ड झाला.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५