मेजर थॉमस कँडी : जोतिबांच्या कार्याची यथोचित दखल

32

शेतकरी व श्रमिकांचे कैवारी महात्मा जोतिबाजी फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. दि.२९ जुलै १८५२ रोजी पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. येथील विश्रामबाग वाड्यात ‘स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते’ संबोधून म.जोतिबाजी फुले यांचा सन्मान सोहळा पार पडला. तर जनतेने मुंबईतील सेभेत इ.स.१८८८मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘दी राईट ऑफ मॅन’ या पुस्तकाचा प्रभाव होता.

महात्मा फुले : शिक्षणमहर्षी म.ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले आणि ज्ञानवर्धिनी माता फातिमाबी शेख यांनी प्राणांतक बालविद्या वंचितापर्यंत प्रवाहित केली. राष्ट्रपिता शिक्षणसम्राट महात्मा जोतीरावजी फुलेंचा जन्म कटगुण येथे दि.११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांचे थोडक्यात सामाजिक कार्य असे- • इ.स.१८४८मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. • दि.१७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली. • १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली. • सन १८५२मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली. • सन १८५५मध्ये रात्रीची शाळा सुरु केली. • इ.स.१८६३मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली. • इ.स.१८६४मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला. • सन १८६८मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला. • शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती शब्दबद्ध केली. यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले. • सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र १८७७ मध्ये सुरु केले.

• आपल्या मित्रांच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्याकरिता मंडळ नावाची संस्था स्थापन केली. • दि.२४ सष्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. • सन १८८०मध्ये त्यांनी कामगारांच्या ज्वलंत प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेची स्थापना केली. • इ.स.१८८८मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या ड्यूक ऑफ कॅनॉट कार्यक्रमात त्यांनी ‘शेतकऱ्यांचा प्रतिनिधी’ म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. • त्यांनी हंटर कमिशनपुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली. यामुळेच प्राचार्य मेजर कँडी यांनी ‘स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्गाते’ म्हणून सन्मान केला. तर त्यांना जनतेने ‘महात्मा’ ही पदवी देऊन गौरविले होते.महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य- महात्मा फुले यांनी लिहिलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.

या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स.१८९१मध्ये प्रकाशित झाला. “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।” असे बहुजन समाजातील लोकांना त्यांनी ठणकावून सांगितले. अशा निधळ्या छातीच्या निडर बहुजन उद्धारकाच्या लोकोपयोगी कार्यांची कोण बरे दखल घेणार नाही? ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेल्या मेजर थॉमस कँडी यांनी ती घेतली. म.फुले हे दि.२८ नोव्हेंबर १८९० रोजी निर्मिकात विलीन झाले.

मेजर कँडी : मेजर थॉमस कँडी यांचा जन्म दि.१३ डिसेंबर १८०४ रोजी इंग्लंडमध्ये झाला. ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते. यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्त्वाचे योगदान दिले. कँडी व त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माग्डालेन कॉलेजमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण घेतले होते. यानंतर दोघांची नेमणूक ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात क्वार्टर मास्टर म्हणून झाली. इ.स. १८२२मध्ये हे भारतात आले. येथे असताना त्यांनी अनेक पायदळ रेजिमेंटांमध्ये दुभाषांचे काम केले. सन १८३०च्या दशकात दोघा भावांनी कॅप्टन जेम्स मोल्सवर्थ यांच्या इंग्लिश-मराठी शब्दकोशाच्या निर्मितीत बहुमोल मदत केली. मोल्सवर्थ इंग्लंडला परतल्यावर थॉमस कँडी यांनी सन १८४०-४७ दरम्यान हे काम नेटाने पूर्ण केले. शब्दकोशाचे काम पूर्ण झाल्यावर जॉर्ज कँडी इंग्लंडला परतले परंतु थॉमस कँडी महाराष्ट्रातच राहिले. त्यांनी आपल्या ख्रिस्ती धर्माच्या शाळांसाठी मराठीतून पाठ्यपुस्तके तयार केली. याशिवाय त्यांनी अनेक त्याकाळच्या महत्त्वाच्या ग्रंथांची मराठीत भाषांतरे केली. यात इंडियन पीनल कोड आणि इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड यांचाही समावेश होता. आपल्या कामाबरोबरच त्यांनी इतर अनेक इंग्लिश-मराठी भाषांतरकारांची कामे तपासून सुधारली व त्यांना सल्लागार म्हणून मदत केली.

ब्रिटिश सरकारने १८६०च्या दशकात त्यांची मुख्य सरकारी भाषांतरकार पदावर नेमणूक केली.एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेत विरामचिन्हांचा उपयोग होत नसे. त्यांनी मराठी भाषेत विरामचिन्हे कशी व कोठे वापरावी? याविषयी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. विराम चिन्हांची परिभाषा नावाच्या या ग्रंथाचा लिखित मराठी भाषेच्या आत्ताच्या स्वरुपावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या समग्र लिखाणाचा एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेवरच एकूण मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांनीच शिक्षणप्रेमी म.फुलेंच्या कार्याची यथोचित दखल घेतली. दि.२९ जुलै १८५२ रोजी त्यांनी आपल्या हस्ते विश्रामबाग वाड्यात जोतीरावजी फुलेंचा गौरव केला. त्यांना ‘स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्गाते’ असे संबोधित केले. कँडी हे पुणे संस्कृत कॉलेजचे मुख्याधिकारी होते. याशिवाय ते डेक्कन कॉलेजचे मुख्याध्यापकही होते. अशा या दिलदार ब्रिटिश अधिकाऱ्याचे दि.२६ फेब्रुवारी १८७७ रोजी महाबळेश्वर येथे निधन झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे म.फुले गौरवदिनी त्या दोघांच्याही स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️सत्यशोधक- कृष्णकुमार आनंदी गोविंदा निकोडे.
[भारतीय संत व थोर पुरुषांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक.]मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी ता. आरमोरी, जि. गडचिरोली.मधुभाष- ७७७५०४१०८६.