आसाम – सीमावादाला हिंसक वळण

27

राज्याराज्यातील सीमावाद हा आपल्या देशासाठी नवा नाही. भारतातील अनेक राज्यात सीमावाद आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद तर जगजाहीर आहे. केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातच नाही तर देशातील अनेक राज्यात वाद आहे. सीमावादामुळे दोन राज्यातील स्थानिक लोकांत विशेषतः दोन्ही राज्यातील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये अनेकदा वादावादी होतात प्रसंगी हातापायीही होते पण राज्यातील सीमावादातून मोठी हिंसा होऊन त्यात पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना याआधी कधी वाचनात आली नव्हती. आसाम आणि मिझोरम यांच्यातील सीमावादाचे हिंसाचारात रूपांतर होऊन मिझोरममधील समाज कंटकांनी केलेल्या गोळीबारात आसामच्या सहा पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.

या घटनेमुळे ईशान्येकडील या दोन्ही राज्यात मोठा तणाव निर्माण झाला असून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर ट्विटरद्वारे टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ट्विटवारमध्ये हस्तक्षेप करत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सीमेवर शांतता राखण्याच्या सूचना केल्या आहेत.
आसाम – मिझोरम सीमावाद वादाचे मुद्दे १९७२ पूर्वी मिझोरम हे आसाम राज्याचाच भाग होता. १९७२ मध्ये तत्कालीन सरकारने मिझोरमला केंद्रशासित राज्य म्हणून घोषित केले तर १९८७ साली मिझोरमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. १९७२ पूर्वी मिझोरम लुशाई हिल्स म्हणून ओळखलं जायचं. आज त्या टेकड्या मिझो हिल्स म्हणून ओळखल्या जातात आणि त्याच आजच्या वादाचं मूळ आहे.

चहाच्या मळ्याचे क्षेत्र वाढवण्यासाठी ब्रिटिश आसाममधील कचर जिल्ह्यापर्यंत पोहचले त्यावेळी स्थानिक मिझो आदिवासी आणि ब्रिटिशांमध्ये मोठा संघर्ष झाला.लुशाई हिल्स हे आपलं मूळ घर आहे असं मिझो आदिवासिंच म्हणणं होतं त्यांचं म्हणणं मान्य करून ब्रिटिशांनी मिझो आदिवासींशी एक करार केला. या करारानुसार आदिवासींना ब्रिटिशांचे कायदेकानून लागू होणार नाही असं ठरवण्यात आले शिवाय आदिवासींच्या क्षेत्रात कोणालाही घुसखोरी करता येऊ नये यासाठी लाईन सिस्टीम लागू केली. आसाम सोबत असलेल्या सीमावाद सोडवण्यासाठी सीमा आयोगाची मागणी करणाऱ्या ठरावावर मिझोरम विधानसभेत चर्चा झाली. त्यात असा संदर्भ देण्यात आला, की कचर आणि लुशाई हिल्स यांच्यामधील सीमा निश्चित करण्यात आल्या आणि त्या १८७५ साली स्वीकारण्यात आल्या. नंतर तो प्रदेश जेंव्हा ब्रिटिश वसाहतवाल्यांनी आपल्या नियंत्रणाखाली आणला तेंव्हा मिझोरमचा नव्याने नकाशा तयार केला गेला आणि कचर मिझोरम सीमा विलीन करण्यात आली. १९३३ साली नव्याने सीमा निश्चित करण्यात आली. हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला.

त्यामुळे १८७५ सालची सीमाच ग्राह्य धरावी. कचर हिल्स आणि लुशाई हिल्स यांच्यात १८७५ साली निश्चित करण्यात आलेली सीमा आणि १९३३ साली लुशाई हिल्स आणि मणिपूर यांच्यात अधिसूचनेद्वारे निश्चित करण्यात आलेली सीमा हा आसाम आणि मिझोरम यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा आहे. १८७५ आणि १९३३ या दोन्ही वेळेच्या सीमांमुळे राज्याच्या क्षेत्रफळात ७४९ चौरस किलोमीटरचा फरक पडत आहे असे मिझोरमचे म्हणणे आहे. आसाम मात्र मिझोरमचे म्हणणे मान्य करण्यास तयार नाही. १९७२ सालापासून हा वाद सुरू आहे आता त्या वादाने हिंसक वळण घेतले असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर हा वाद मिटवावा कारण आसाम आणि मिझोरम हे ईशान्य सीमेवरील महत्वाची राज्य आहेत. त्यांच्यातील हा वाद जर आणखी विकोपाला गेला बाह्य शक्ती त्याचा लाभ उठवू शकते आणि तसे झाले तर भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वला मोठा धोका पोहचू शकतो.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)