रमणबाग प्रशालेत माजी विद्यार्थ्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी

29

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.30जुलै):- डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला यंदा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच पार्श्वभूमी वर रमणबाग माजी विद्यार्थी संघ विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमे निमित्त संघा तर्फे एक खास कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास संघा कडून माजी शिक्षकांपैकी काही शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रशाले च्या शिक्षिका श्रीमती केदारी यांनी गुरुवंदना सादर केली.

रमणबाग प्रशाले चे माजी विद्यार्थी संघाचे डॉ. जयंत जोशी अध्यक्षस्थानी होते तर डे. ए. सो. चे उपाध्यक्ष डॉ. महेश आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी शिक्षकांपैकी सर्वात वयोवृद्ध नव्वदी पार केलेले शिक्षक भा. काकडे आणि टि. के. आपटे यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. या दोन्ही जेष्ठ शिक्षकांची स्मरणशक्ती पाहून सर्वच आचंबित झाले. डॉ एच के संचेती, उद्योजक प्राज चे प्रमोद चौधरी, खासदार प्रकाश जावडेकर आणि गिरीश बापट, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक आणि असे कितीतरी माजी विद्यार्थी जे प्रशालेतून शिकून बाहेर पडले आणि आज विविध क्षेत्रात यशस्वी होऊन नावारूपास आले त्या सर्व विद्यार्थ्यांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. माजी विद्यार्थी संघाच्या वतीने श्री. गोखले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रशाले चे मुख्याध्यापक दिलीप रावडे यांनी आभार प्रदर्शनात माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या आर्थिक मदती मुळे शाळेच्या झालेल्या विकासा संबंधी समाधान व्यक्त केले तसेच शाळेचे जुन्या पिढी चे व शारीरिक शिक्षण या विषयाचे सर्वांचे आवडते प्रशिक्षक रामभाऊ लेले यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थ्यांच्या भरगोस देणगी मुळे शाळेच्या आवारात लवकरच अद्यावत व्यायाम शाळा सुरू होत असल्याचे घोषित केले. कार्यक्रमास राष्ट्रीय खोखो पटू आणि जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व माजी विद्यार्थी संजय लेले आणि संघाचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन रविंद्र इनामदार आणि नारायण गरुड यांनी केले. सूत्र संचालन सुहास धारणे यांनी केले.