नगर पंचायत क्षेत्रात घाणीचे साम्राज्य अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

34

🔹मोठया प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव, नगरपंचायत प्रशासनाचे अस्वच्छतेकडे दुर्लक्ष

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.31जुलै):- मागील आठवड्यात सर्वत्र झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक प्रभागात घाण साचून असल्याने तसेच अस्वच्छता असल्याने यावर डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे स्थानिक नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रति तीव्र रोष व्यक्त होत आहे.

पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच नगरपंचायत प्रशासनद्वारे शहरातील सर्वच प्रभागात रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे होते मात्र नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्याने जिवतीवासीयांना डासांचा त्रास व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक रोगांना निमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात अनेक ठिकाणच्या नाल्या तुडुंब भरून असल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे, यामुळे मलेरिया, टाईफाईड, डेंग्यू असे आजार वाढण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने शहरातील सर्वच प्रभागात डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्याची मागणी जोर धरत आहे.