…आणि जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले; कलाकारांवर पाच लाखापर्यंत उपचार करण्याची उमेश चव्हाण यांची घोषणा!

48

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

पुणे(दि.10ऑगस्ट):- गेले दीड वर्षे नाटकाचे प्रयोग बंद आहेत. सिनेमागृह बंद आहेत. नवरात्र – गणेशोत्सव, जत्रा – यात्रा बंद असल्याने आमची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपलाय, अश्या परिस्थितीत उतार वयात दुसरं कुठलंही काम करण्याचा अनुभव नाही. आजारी पडलोच तर हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना आम्ही काय करायचं? असा आर्त सवाल ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केला.

यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी तात्काळ प्रतिसाद देत आपल्या कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ कलाकारांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याची घोषणा केली. आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले. त्यांनी रडतच हात जोडून आभार मानले. यावेळी उमेश चव्हाण यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे आणि जयमाला इनामदार यांना वाकून नमस्कार करून घाबरू नका, काळजी करू नका. मी आहे असे म्हणताच काही काळ वातावरण भावनिक झाले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

निमित्त होते कलारंग परिवार सांस्कृतिक कला अकादमीच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याचे यामध्ये श्री स्वामी समर्थ आदर्श समाज सेवा पुरस्कार रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. शाल, गौरवचिन्ह, पिंपलवृक्षाचे रोप देऊन त्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन कलारंग परिवाराचे अध्यक्ष संतोष उभे यांनी केले होते. गायक चित्रसेन भवार, रविंद्र खराडे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. अनेक कलाकारांना यावेळी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.