निरीश्वरवादी लेखिका इरावती कर्वे !

30

[इरावती कर्वे स्मृती दिवस विशेष]

इरावती कर्वे या मराठी लेखिका होत. मानव वंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. ‘चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण’ हा विषय घेऊन त्या एमए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.

मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली. भारतात परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. इ.स.१९३९मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानव वंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. इ.स.१९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.इरावती कर्वे यांचा जन्म म्यानमारमधील मिंजान येथे दि.१५ डिसेंबर १९०५ रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माजी प्राचार्य दि.धों.कर्वे यांच्या पत्नी होत. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.

तेथे असताना त्यांचा दि.धों.कर्वे यांच्याशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. त्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. गौरी देशपांडे या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ.आनंद कर्वे हे ॲश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.
इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे- १) सन १९७१मध्ये महाभारतावरील समीक्षा ग्रंथ- युगान्त, धर्म (पुस्तक), महाराष्ट्र एक अभ्यास, २) ललित लेखसंग्रह- सन १९७२मध्ये गंगाजल, संस्कृती (पुस्तक), सन १९४९मध्ये परिपूर्ती, सन १९६४मध्ये भोवरा, हिंदूंची समाज रचना, ३) समाजशास्त्रीय ग्रंथ- सन १९६०मध्ये आमची संस्कृती, सन१९५१मध्ये मराठी लोकांची संस्कृती, सन १९७५मध्ये हिंदू समाज एक अन्वयार्थ, याशिवाय इंग्रजी भाषेमधूनही त्यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. इरावती यांनी मानवशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत विपुल संशोधन केले. त्यांचे सुमारे ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. यांतील बहुतेक इंग्रजी ग्रंथांस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजी व मराठी नियतकालिकांतून स्फुट लेखनही केले.

युगान्तप्रमाणे रामायणावर असेच एखादे चिकित्सक पुस्तक लिहावे, असा त्यांचा विचार होता. त्या १९४७ मध्ये दिल्लीच्या सायन्स काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या मानवशास्त्रातील संशोधनामुळेच त्यांची लंडन विद्यापीठांत व्याख्यात्या म्हणून एक वर्षाकरिता नियुक्ती झाली होती. त्याच साली प्रागितिहासाच्या सकल आफ्रिकी काँग्रेसमध्ये त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले.इरावती कर्वे यांची राहणी अत्यंत साधी व वृत्ती पुरोगामी होती. वयाच्या पासष्टाव्या वर्षी दि.११ ऑगस्ट १९७० रोजी हृदयविकाराच्या आघाताने त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या युगान्त या पुस्तकाला सन१९७२चा साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री एन. कृष्णकुमार जी. गुरूजी.(मराठी लेखक व कवी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली मधुभाष-७७७५०४१०८६.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com