स्वातंत्र्यापासून देश उभा करण्यात गांधींचा वाटा मोठा- पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार

26

🔹खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16ऑगस्ट):- देशावर इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर महापुरुषांनी त्याग, बलिदान दिले. त्या त्यागातून देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाला उभा करण्यात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील गांधी चौकात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री वडेट्टीवार बोलत होते. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. मागील दोन वर्षे कोरोनात गेले. आता मोकळा श्वास घेत आहोत. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी बंद पडलेले उद्योग, कोळसा खाणी सुरु करण्यात येत आहेत.
यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीसुद्धा देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी दिलेले बलिदान देश कधीही विसरणार नसल्याचे सांगितले.

यावेळी महापालिकेसमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाची शपथ घेण्यात आली. उपस्थित सर्व नागरिकांना लाडू, बर्फीचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक नंदू खनके यांनी केले. संचालन श्री. आक्केवार यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.