लवूळ येथील तलाठी बी.आर डाकेवाड यांची बदली रद्द करावी- अक्षय शिंदे

30

✒️लवुळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लवुळ(दि.17ऑगस्ट):-माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील तलाठी बी. आर. डाकेवाड साहेब यांची बदली दोन दिवसांपूर्वी झाली होती ही बदली रद्द करून त्यांना लवुळ येथेच ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते अक्षय शिंदे केली आहे. माजलगाव तालुक्यातील लवूळ सज्जा हा खूप मोठा असून या ठिकाणी मागील तीन वर्षांपासून तलाठी डाकेवाड साहेब यांनी चांगला कारभार चालवला होता. त्यांनी शासनाकडून आलेल्या वेगवेगळ्या योजना चांगल्या पद्धतीने राबवत त्या गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी खूप प्रयत्न केले .

शेतकरी बांधवांना कर्जासाठी तसेच इतर कामासाठी लागणारी कागदपत्रे तात्काळ देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा सातबारा देण्याचे काम त्यांनी चांगल्या प्रकारे केले. यामुळे शेतकऱ्यांना जास्त त्रास झाला नाही शेतकरयांना जास्त फिरावे लागले नाही .

मागील तीन वर्षांपासून कसलाही भेदभाव न करता चांगले काम करणाऱ्या तलाठी बी. आर डाकेवाड साहेब यांची बदली दोन दिवसापूर्वी तालुक्यातील इतरत्र करण्यात आली आहे. त्यांची झालेली बदली तात्काळ रद्द करून त्यांना लवुळ येथील सज्जा वरच कायम ठेवण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी तसेच युवा नेते अक्षय शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
ही बदली रद्द न केल्यास व डाकेवाड साहेब यांना परत लवूळ सज्जा न दिल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शिवसंग्रामचे युवा नेते अक्षय शिंदे यांनी दिला आहे.