आजचा माझा “महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार” मतदार संघातील कोविड योद्ध्यांना समर्पित- आमदार राजेश एकडे

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.२२ऑगस्ट):-महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार आज राजभवन,मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मलकापुर मतदार संघाचे आमदार राजेश भाऊ एकडे यांना देण्यात आला

मागील वर्षी जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर भारतात तसेच राज्यात देखील कोविडचे ठिकठिकाणी रुग्ण आढळून येऊ लागले.नवीनच आजार असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील मोठमोठे डॉक्टर्स तसेच आरोग्य सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते देखील गांगरून गेले होते.आज देखील कोरोनाच्या नुसत्या आठवणीने अंगावर शहारे येतात.परंतु त्या अतिशय कठीण अशा संकटसमयी ज्या ज्या व्यक्तींनी धीरोदात्तपणे यथाशक्ती या आजाराचा मुकाबला केला.

अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यातील निवडक अशा ३८ गणमान्य व्यक्तींना सामाजिक कल्याणार्थ अनुसरणिय सेवा प्रदान केल्याबद्दल आज राजभवनात हा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला….!!

यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिथयश डॉक्टर्स, सिनेकलावंत,अँकर,सामाजिक क्षेत्रात समुपदेशनाचे कार्य करणारे तसेच लोकोपकारी उपक्रमात सहभाग असणारे गणमान्य व्यक्ती आदींचा समावेश होता. राज्यातील २८८ आमदारांमधून ३ आमदारांना प्रातिनिधिक स्वरुपात त्यांनी या संकटसमयी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र जनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

विदर्भाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातुन आयोजकांनी आमदार राजेश एकडे याची या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल आमदार मा. राजेश एकडे यांनी संपूर्ण मतदारसंघाचे वतीने आयोजकाचे आभार मानले आणि त्यांना मिळालेला पुरस्कार मतदारसंघातील सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.कुठलाही गाजावाजा न करता श्रद्धेने या कठीण काळात झोकून देऊन रुग्णसेवा करणारे सच्चे कार्यकर्ते हे माझे खरे बळ व प्रेरणास्थान आहे.अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नसल्याने गाफील न राहता आपण एकजुटीने या संकटाचा मुकाबला करु असे आवाहनही यावेळी केले…!!

सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व आधारस्तंभ डॉक्टर राहुल सुबोध सावजी यांनी या मार्गदर्शक कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करून महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंगजी कोशारी यांचे हस्ते हा महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार सोहळा प्रदान करणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला,त्याबद्दल मी आभार व्यक्त करून डॉक्टर राहुल सावजी हे माजी मंत्री तसेच राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यात आपल्या कर्तुत्वाने लोकप्रिय झालेल्या सुबोधभाऊ सावजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्य करायला निघालेले आहेत.त्यांनाही मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करतो,असे मनोगत यावेळी आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले…