नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार

27

🔸चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी

🔹उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.28ऑगस्ट):- गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे ज्या नोकऱ्या होत्या, त्या ही हिरावल्या गेल्या आणि लाखो तरुणांना बेरोजगार व्हावे लागले. त्याच धर्तीवर चोपडा येथे या भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि त्यात तब्बल चार हजार युवक नोकरीच्या शोधात उपस्थित राहिले. यावरून सध्या रोजगारीचे किती विदारक चित्र निर्माण झाले आहे याचा अंदाज बांधता येईल.अशाही परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी उपस्थित सर्व बेरोजगार युवकांना नोकरी दिली जाईल.ज्यांनी-ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे अशा सर्व युवकांना टप्प्याटप्प्याने नोकरी दिली जाईल असा आशावाद त्यांनी दाखविला.

कोरोना काळात असंख्य युवक बेरोजगारीचे चटके सहन करीत असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेस, चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भगिनी मंडळ आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयांमध्ये दि. २६ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास ६० कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नोंदणी केलेले चार हजार बेरोजगार युवकांची मुलाखत घेऊन १५०० युवकांची निवड करण्यात आली. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनीही या मेळाव्यात जे बेरोजगार युवक हजर आहेत या सर्वांना नोकरी दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

येथील चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट मार्फत बेरोजगारी दूर व्हावी याकरीता सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याच दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा पिपल्स बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, आशिषभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, संजय गरूड, सुमित पवार, गोरखतात्या पाटील, गटनेते जीवन चौधरी, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, ॲड. घनशाम पाटील, शहराध्यक्ष शाम परदेशी, शेखर पाटील, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष भारती बोरसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र शिरसाठ, रमेश शिंदे, आनंदराव रायसिंग, गिरीष पाटील, पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत खैरनार, यशवंत पाटील, युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर देशमुख, इनरव्हिल क्लब अध्यक्षा पुनम गुजराथी, बाळासाहेब पाटील, कृष्णा पवार, नारायण पाटील, प्रवीण गुजराथी, सरचिटणीस अशोक पाटील, गोकुळ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले.

महोत्सवाचे अध्यक्ष विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी बोलतांना म्हणाले की, आज बेरोजगार युवकांना भाषण नको तर आयुष्यभराचे राशन पाहिजे म्हणून राशन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याकरीता जवळपास ६० कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. भिवंडी येथील एका कंपनी संचालकांनी सांगितले की आम्ही ७०० युवकांना नोकरी देणार आहोत. प्रत्येकास १३ हजार रुपये प्रतिमाह पगार आणि राहण्याची व्यवस्था कंपनीकडून करण्यात येईल अशी मागणी होते आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल बँकेच्या माध्यमातून नोकरी हा उपक्रम इथेच न थांबता अखंड सुरुच राहील. आज जवळपास चार हजार बेरोजगार युवक उपस्थित आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल म्हणून सगळ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून होईल. या मेळाव्याचा कोणताही राजकीय लाभ न घेता एक कर्तव्य समजून हा नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे असा भव्य नोकरी महोत्सव सातत्याने होत राहील, असेही अरुणभाई गुजराथी यावेळी म्हणाले. महोत्सवाचे प्रास्ताविक आशिषभाई गुजराथी यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.

*इनरव्हील सदस्यांचा महोत्सवात सक्रिय सहभाग*

महोत्सवात चोपडा इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा पूनमबेन गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. नोकरी महोत्सवात आलेल्या प्रत्येक तरुण-तरुणींचे शंकांचे समाधान केले. या महोत्सवात इनरव्हील क्लबच्या माध्यमातून तरुण तरुणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यासोबतच तरुणांना चांगला रोजगार प्राप्त व्हावा यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी पुनमबेन गुजराथी यांच्यासह इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

या महोत्सवासाठी बाळासाहेब पाटील, नारायण पाटील, शहराध्यक्ष शाम परदेशी, अक्रम तेली, सनी सचदेव, प्रफुल्ल स्वामी, प्रफुल्ल पाटील, नौमान काझी,राजु भाटीया, अकील जहागीरदार, समाधान माळ, मनोज पाटील, सागर महाजन, राहुल पाटील, मयुर पाटील, सौरभ ठाकरे, मोहसिन शेख, नईम शेख, जमिल कुरेशी, लहुश धनगर आदींनी परिश्रम घेतले.