विहरीतील मोटारी चोरणाऱ्या टोळीला नागरीकांनी चोप देवून केले पोलिसांच्या स्वाधीन

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

माण(दि.30ऑगस्ट):-तालुक्यामध्ये गत काही दिवसांपासुन शेतकर्यांच्या विहीरीवरील विद्युत मोटारींची चोरी होण्याचे प्रकारात वाढ झाली असुन या चोरी सत्रामुळे शेतकरीवर्गातुन संताप व्यक्त होत असतानाच दि.२८ रोजी म्हसवड परिसरातील ढाकणी या गावामध्ये अशाच प्रकारे विद्युत मोटारी चोरणारी टोळीच ग्रामस्थांच्या हाती लागल्याने ग्रामस्थांनी या चोरट्यांना बेदम चोप देत म्हसवड पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत म्हसवड पोलीसांनी दिलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील ढाकणी या गावातील बाबा दादा खाडे यांचे ढाकणी गावातील काळेशेत नावाच्या शिवारात शेत असुन त्यामध्येच त्यांची विहीर आहे, त्या विहीरीवर त्यांनी ३ एच.पी. ची विद्युत पानबुडी मोटार बसवली असुन त्याद्वारे ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्याचे काम करीत असतात. दि.२८ रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे आटोपुन आपल्या घरी गेले त्याच दिवशी रात्री साडे ‌९ वाजता त्यांच्या मुलाच्या मोबाईल वर ढाकणी ग्रामस्थांनी फोन करुन सांगितले की तुमच्या विहीरीवरील पानबुडी मोटार चोरण्यासाठी आलेल्या ४ जणांना आम्ही ताब्यात घेतले असुन तुम्ही लवकर या असा फोन आल्याने बाबा खाडे व त्यांची दोन मुले व शेजारी बारीकराव शिंदे असे सर्वजण त्याठिकाणी पोहचले असता सदरच्या ठिकाणी त्यांना आणखी गावातील १० ते १५ जण ओळखीचे दिसले.

त्या सर्वांनी बाबा खाडे यांना सांगितले की आमच्यापैकी काहीजण तुमच्या विहीरीकडुन येत असताना दोन लोक विहीरीच्या कडेला उभे दिसले सदरचे ते लोक अनोळखी असल्याने त्यांच्याविषयी ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी फोन करुन गावातील इतरांना त्याठिकाणी बोलावुन घेतले व त्या सर्वांनी बाबा खाडे यांच्या विहीरीवर जावुन पाहिले असता आणखी दोन इसम विहीरीमध्ये उतरुन पानबुडी सोडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ग्रामस्थांना पाहुन यापैकी वरील दोघांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करुन काही ग्रामस्थांनी पकडले तर विहीरीमध्ये असलेल्यांना विहीरीबाहेर बोलावले त्यांच्याकडे ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप देत म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिले.

म्हसवड पोलीसांनी सदर इसमांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विठ्ठल श्रीमंत बोडरे वय २५, आबा किसन सरगर वय २५, बाजीराव रामचंद्र चव्हाण वय ४०, व उमाजी विलास बुधावले वय २६ अशी नावे सांगितली असुन हे सर्वजण राहणार कन्हेर – इस्लामपुर ता. माळशिरस, जि. सोलापुर येथील आहेत. त्यांच्याकडुन पोलीसांनी दोन मोटारसायकली, दोन करवती, एक विळा, दोरी असा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाची बाबा दादा खाडे यांनी म्हसवड पोलीसांत फिर्याद दाखल केली असुन पोलीसांकडुन ताब्यात घेतलेल्या वरील चौघांची कसुन चौकशी सुरु आहे.