ब्राह्मण सभेचे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा व स्व. मनोहरपंत बडवे सभागृहाचे शानदार सोहळ्यात लोकार्पण

33

🔹मातीशी असलेले घट्ट नाते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ नाते- ना.धनंजय मुंडे

🔸परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे व्यासपीठ – खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.1सप्टेंबर):-मातीशी असलेले घट्ट नाते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ नाते आहे. ब्राह्मण सभेच्या माध्यमातून एक चांगली वास्तू उभी राहिली असून ही वास्तू येणाऱ्या काळात अध्यात्मिक व संस्कृतीक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर ठरेल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. तर ब्राह्मण सभेने निर्माण केलेले हे मंदिर व सभागृह परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे व्यासपीठ म्हणून पुढे येईल असा विश्वास बीडच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी व्यक्त केला.ब्राह्मण सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा व स्व मनोहरपंत बडवे सभागृहाचे शानदार सोहळ्यात लोकार्पण झाले याप्रसंगी मान्यवर बोलत होते.

परळी शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण आज सोमवारी (दि.३०) संपन्न झाले. या सोहळ्याला सकाळच्या सत्रात प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांच्या हस्ते मुर्ती न्यास कार्यक्रम झाला.तर मुख्य समारोप सोहळा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे,खा.डाॅ. प्रीतम ताई मुंडे, आमदार संजय दौंड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारंभाच्या प्रारंभी मान्यवरांचे सुवासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजन करून दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित ब्रह्मवृंद यांनी वेदोक्त मंत्र उच्चार करत पुण्याहवाचन केले.

मुख्य समारंभात मान्यवरांचा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ब्राह्मण सभेच्या वतीने अध्यक्ष शरदराव कुलकर्णी, सचिव प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष वासुदेवराव पाठक, अरुणराव पुराणिक, मधु जामकर, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, श्रीकांत मांडे डॉ. सतीश रायते आदींनी मान्यवरांचा सत्कार केला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्व. मनोहरपंत बडवे यांच्या वंशज कुटुंबियांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे चार दिवसापासून धार्मिक विधी व वेदोक्त पौरोहित्य करणाऱ्या ब्रह्मवृंदाचा गौरव करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले की ब्राह्मण सभेशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वच उपक्रमात आपण सहभागी होतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर व स्व. मनोहरपंत बडवे सभाग्रह हे सर्वांसाठी उपयुक्त व्यासपीठ ठरणार आहे. परळीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील भर टाकणारे हे मंदिर निश्चित ठरेल असा विश्वास ना. मुंडे यांनी व्यक्त केला. ब्राह्मण सभेच्या समाजोपयोगी उपक्रमात सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही ना. मुंडे यांनी दिली. खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, ब्राह्मण सभेचे उपक्रम हे कौतुकास्पद असतात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हे सभागृह परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरणार आहे. ही वास्तू सर्वांसाठी एक संस्कार केंद्र ठरेल.

लोकनेते गोपीनाथ राव मुंडे यांनी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे नाते सदैव जपण्यासाठी आमचा प्रयत्न राहील असा विश्वास खा. डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकपर मनोगतातून बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी ब्राह्मण सभे द्वारा निर्माण करण्यात आलेल्या मंदिर व स्व मनोहरपंत बडवे सभाग्रह याबाबत माहिती दिली तसेच या कार्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रकाश जोशी यांनी ब्राह्मण सभेच्या उपक्रमाविषयी आपल्या मनोगतातून माहिती दिली. मानपत्र वाचन श्रीकांत मांडे व सौ ज्योतीताई नागापूरकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर गुरुप्रसाद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास परळी शहरातील सर्व स्तरातील नागरिक पदाधिकारी ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.