शिक्षण व्यवस्थेतील राजकारणावर भाष्य करणारे “सत्तासंघर्ष”  प्रसिद्ध नाटककार अरुण मिरजकर यांचे प्रतिपादन

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.5सप्टेंबर):-डाॅ.स्वप्नील बुचडे लिखित “सत्तासंघर्ष” हे नाटक शिक्षण क्षेत्रातील गलिच्छ राजकारणावर सडेतोड भाष्य करणारे आहे. त्यामुळे अलिकडच्या मराठी वाड्मयात हे एक अतिशय महत्वाचे नाटक आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार,दिग्दर्शक अरुण मिरजकर यांनी केले. ते निर्मिती प्रकाशन प्रकाशित ‘सत्तासंघर्ष’ या नाटकाच्या प्रकाशन समारंभावेळी बोलत होते. हा प्रकाशन समारंभ 5 सप्टेंबर रोजी निर्मिती प्रकाशन येथील आदित्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना मिरजकर म्हणाले, हे नाटक राजकारणाच्या मोठ्या परिघाला स्पर्श करणारे आहे. वास्तवाची मांडणी करणारं हे नाटक वाचकाला चकवा देते. सध्यकाळात साहित्यिक व्यवहार ठप्प झाले असताना नाटक प्रकाशित करण्याचे धाडस बुचडेंनी केले आहे. प्रस्थापितांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आणि त्यातील दाहकता सत्तासंघर्ष मधून समोर आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील राजकारणाचा आढावा घेणारं हे नाटक आजच्या नाटक व्यवस्थेला अधिक व्यापक करणारे आहे.

यावेळी बोलताना लेखक,समीक्षक डाॅ.गिरीष मोरे म्हणाले, माणसाच्या आत असलेली वर्चस्व लादण्याची मानसिकता हे नाटक स्पष्टपणे मांडते. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा स्वार्थी असतो. तो तसा नसला तर जगणार नाही. मात्र माणूस त्याला अपवाद आहे. कारण,त्याला समाजसृष्टी लाभलेली आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रसिद्ध लेखक,समीक्षक डाॅ.राजेखान शानेदिवाण म्हणाले,सत्तासंघर्षात जे मांडले आहे ते मी गेली अनेक वर्षे जगतो आहे. भूमिका घेणे सगळ्यांनाच जमत नाही पण ती आताच्या काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यास मंडळाचा अनागोंदी प्रकार सत्तासंघर्ष नाटकातून अचूकपणे मांडला आहे. यावेळी श्रीराम साळुंखे यांनी हे नाटक वास्तवाला स्पर्श करत असल्याबद्दल भूमिका व्यक्त केली. यावेळी लेखक डाॅ. स्वप्नील बुचडे यांनी सत्तासंघर्ष या नाटकाचा एकूण लेखन प्रवास मांडला.

या प्रकाशन समारंभाचे सुत्रसंचालन डाॅ. अविनाश वर्धन यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले. आभार प्रा. प्रदिप पाटील यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. दिपककुमार वळवी, डॉ. राहुल मांडणीकर, डाॅ. सर्जेराव पद्माकर, डॉ. पल्लवी बुचडे, प्रा. गौतम जाधव, शर्मिला शानेदिवाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED