बघण्याचा दृष्टिकोन….!

77

काही दिवसांपूर्वी माझा मित्र महेंद्र गिरी यांचा कॉल आला होता. फोनवर संभाषण करत असताना त्यांनी विचारले, की ‘बघण्याच्या दृष्टीकोनाविषयी’ काही लिहिता येईल का? मी म्हटलं, “नेमके काय आणि कसे लिहायचे जरा विस्ताराने समजावून सांगता का?” त्यावेळेस त्यांनी त्यांचा दृष्टिकोन सांगितला आणि मी माझा! विषय थोडा किचकट आणि समजायला अवघड होता, पण लिहितो असे त्यांना सांगितले.

मी देखील उपरोक्त मुद्द्यावर खूप विचार केला. आजूबाजूचे निरीक्षण,लोकांचे विचार आणि आचार, माझे स्वतःचे निरीक्षण केले. तेव्हा लक्षात आले, की विषय थोडा अलग व लिहायला कठीण आहे. पण यावर आपण नाही लिहिणार तर कोण लिहिणार म्हटले आणि लिहायला लागलो.

काय असतो हो! ‘दृष्टिकोन म्हणजे!’ 4-5 अर्ध्या पूर्ण शब्दांचा केवळ एक शब्दच का? काही विश्लेषण असेलच की जे तुम्ही केले; अर्थात करत असाल कधी-कधी. नाहीतर तुमची दृष्टीच असेल तशी. दृष्टिकोन म्हणजे काय हे विस्ताराने सांगण्यापूर्वी तो वाईटही असू शकतो आणि चांगलाही हे आधी स्पष्ट करतो. नाहीतर व्हायचे कसे आपण सकारात्मकताच शोधत बसायचो. अर्थात सकारात्मकता ही असावीच;किंबहुना खूप जास्त असावी. पण कसे आहे, एक नकारात्मक बाजूपण असते, जी कधी सकारात्मकता समजावून सांगण्यास मदत करते.

रस्त्याने एक सुंदर स्त्री जात आहे. तुम्ही तुमच्या बायकोसोबत आहात. इकडे-तिकडे पाहत आहात. ज्यांचा अर्थाअर्थी आपल्या जीवनाशी काहीही संबंध नाही, त्या बाबीही पाहत आहात. याला केवळ पाहणे म्हणत नसून ‘निरीक्षण करणे’ असे म्हणतात. कारण याच निरीक्षणाचा फायदा हा आपले विचार, अनुभव तयार होण्यासाठी होत असतो. जे बऱ्याचवेळा आपल्या समस्यांचे उत्तर शोधून देण्यास मदत करते. म्हणून, पाहत राहायला पाहिजे. सगळेच पहायला पाहिजे. चांगले-वाईटही! कारण, ते तुमच्या कठीण काळात कदाचित कोडं सोडविण्याची किल्ली होऊ शकते. असो!

जसे तुम्ही रस्त्याने दुकाने पाहता, रस्त्याचे खड्डे बुजलेले आणि उखडलेलेही पाहताच की, कधी-कधी तर लहान होऊन पोकलॅंड चर खोदत असलेलेही पाहता. प्रत्येक वेळी तुमची सहचारिणी सोबत असतेच असे नाही. पण, काही वेळा म्हणजे बऱ्याचवेळा राहते ती सोबत, अर्धांगिनीच शेवटी! मग ही सुंदर स्त्री जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा तुमच्या मनात जे विचार येतात ते तुमचा तिच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन ठरवतात. तुमचा दृष्टिकोन खरंच एक सौंदर्य उपासक म्हणून असेल तर आपसूकच तुमच्या तोंडून “काय सुंदर आहे ही स्त्री!” हे उद्गार निघतात. बाजूला आपली बायको असली तरीही! बायकोला जसा नवरा जगातला सगळ्यात सुंदर पुरुष वाटतो तसे तुम्हालाही ती सुंदर वाटत असेलच! पण, रस्त्यावरची स्त्री सुंदर म्हटली म्हणजे दोघीचेही सौंदर्य एकमेकांना फिके नक्कीच पाडणार नाही. मुळात ती स्त्री, ‘सुंदर आहे’, असे प्रमाणपत्र घेऊन फिरत नव्हती. फक्त तुम्हाला तिच्यातले सौंदर्य दिसले म्हणून ती सुंदर!

कापडाच्या दुकानात रंगीबेरंगी कपडे असतात. त्यातला एखादा पिवळा रंग तुम्हाला आवडत नसेल म्हणून तुम्ही स्पष्ट नकार देता, पण तोच रंग कदाचित दुसऱ्याचा आवडता असू शकतो. कारल्याची भाजी मी खात नाही, म्हणजे काय सगळे जगच खात नाही! असा अर्थ होतो का? मग तो तुमचा दृष्टिकोन ठरवतो. जसे, मला ती कडू वाटते म्हणून खात नाही. कडू असणे हे माझ्यासाठी झाले नकारात्मक! पण या नकारात्मकतेमध्ये कोणी सकारात्मकता शोधली. ‘कडू म्हणजे शरीराला चांगले!’ औषधी गुणधर्म आहेत म्हणून खायला लागले.

बघण्याच्या दृष्टिकोनावर मी का लिहीत आहे? तो कसा असतो हे सांगण्यासाठी का? तर नाही! तो मी कसे सांगू शकेल बर! ते तुम्हीच सांगू आणि ठरवू शकता. फक्त तो नेहमी चांगलाच असावा एवढे सांगण्यासाठी हे लिखाण आहे. एकदा वाईट दिसायला लागले की सगळे जगच वाईट दिसते. जसे तुम्ही रस्त्याने चालणारी स्त्री पाहत असाल तर तुमची बायकोही एखादा पुरुष पहात असेल तर तिचा दृष्टिकोन हा वाईट होता, आणि माझा चांगला! हे कसे आपल्यालाच ठरवता येईल बरं! ती पण सौंदर्य नाहीतर त्याची चालढालच न्याहळत असेल न! कदाचित त्यातून ती हेही ठरवत असेल, की माझ्या नवऱ्याचा रुबाब याहून भारी आहे. मग, आपण असे वेगळे मापदंड देऊ शकत नाही. स्त्रियांनाही हाच नियम लागू आहे. विशेषकरून ज्या आपल्या नवऱ्यावर विनाकारण संशय घेतात त्यांच्यासाठी!

बघण्याच्या वाईट दृष्टिकोनाचा तोटा गरिबांना जास्त होतो. गरीब याअर्थी ज्यांचे राहणीमान कसे आहे याहून आपण त्याची गरिबी, लायकी, इमानदारी ठरवतो. तो देखील आपला एक नकारार्थी दृष्टिकोनच असतो म्हणा! एका दुकानात चोरी झाली. चोरीला एक पेनच गेली. दुकानात सी.सी.टीव्ही होताच. पण, मालक काय करतो सगळ्यांना न्याहळतो, कोण या गरिबीच्या व्याख्येत बसतो, त्याला उद्धटपणाने विचारतो, अरेरावीने बोलतो. आणि पेन कुठे ठेवली हे त्यालाच विचारतो. त्याचा दोष काय? तर त्याचे राहणीमान बरोबर नव्हते. फाटके आणि मळके कपडे यावरून आपण त्याची इमानदारी ठरवली. सी.सी.टीव्ही फुटेज पहाल्यावर कळले, की पांढरेशुभ्र कपडे घातलेला आणि गळ्यात चार तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट घातलेला व्यक्ती दहा रुपयाच्या पेनचा चोर होतो.

उपरोक्त उदाहरणात तुम्ही त्या व्यक्तीचे राहणीमान पाहून गरीबीपर्यंत सिमीत राहिले तर ठीक होते. त्याच्या बेईमानीचा पुरावा तयार करण्याची गरज तुम्हाला नव्हती. आणि हा एक श्रीमंत व्यक्ती चोर निघाला म्हणून तुम्ही त्याच गोष्टीचे सामान्यीकरण करून श्रीमंत व्यक्ती हा चोर असतो, असेही ठरवू शकत नाही. तो फक्त योगायोग होता. प्रत्येकवेळीच असे घडत नाही. लोकांच्या या वाईट दृष्टिकोनामुळेच गरिबांच्या इमानदारीवर संशय घेतला जात आहे.

वाईट दृष्टिकोनाचा वाईट परिणाम बऱ्याच व्यावसायिकांवर तथा नोकरदारांवर पण होत आहे. त्यांच्या कौशल्यावर व इमानदारीवर राजरोस संशय घेणे वाढले आहे.एखादा टेलर शिवलेले कपडे वेळेवर देत नसेल तर सगळे टेलर असेच असतात म्हणणे असो, नाहीतर एका दवाखान्यात तुमचा इलाज बरोबर झाला नाही म्हणजे डॉक्टर कामात दिरंगाई करतात हे आपण एका उदाहरणावरून ठरवू शकतो का? शिक्षकांच्या व्यावसायिक गुणवत्तेवर संशय घेऊनच ट्युशन/क्लासेस हे प्रकार वाढले आणि आपणच खर्चिकतेत जाऊन कंगाल होऊन बसलो. खराच वाईट अनुभव आला असेल तर त्या नकारात्मकतेतून सकारात्मकता शोधावी. नकारात्मकतेतुन नकारात्मकता जन्माला घालणे म्हणजे मूर्खपणाच!

मुलगा रोज खेळायला जातो, म्हणजे त्याचा वेळ वाया घालवतो, हा दृष्टिकोन कधी चुकीचा का वाटत नाही? मुलगी मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते म्हणजे तिच्या मागे जाऊन सोक्षमोक्ष घेणे जरुरीचं आहे का? दरवाज्याचे लॉक लागले की नाही हे पुनः पुनः पाहणे जितके जरुरी तितकेच स्वतः चे संस्कार पुनः तपासणेही जरुरी आहे.

वेस्टर्न कपडे घालून कोणाची इज्जत ठरत नाही, आणि तसे राहून कोणी मोठेही होत नाही. चार-दिवस तो व्यक्ती जरासा वेगळा वाटतो, एवढेच मर्यादित राहूया न आपण!

अनाथ आश्रमातून घरी नेलेल्या मुलांवर अन्याय होतो म्हणून खूप चौकशा करणे चालू आहे, म्हणून लोकं अनाथ मुले घ्यायलाही घाबरत आहेत, रस्त्यावर रक्तबंबाळ पडलेल्या व्यक्तीला मदत केली म्हणून मदत करणाऱ्या त्याच व्यक्तीच्या सतराशे चौकशा लागत असतील तर तो दृष्टिकोन चुकीचा होता म्हणूनच असे प्रकार घडत आहेत. अर्थात हे जरुरी आहे; पण सगळ्यांना एकाच चष्म्यातून पहाणे गरजेचे आहे का? असेल तर इतर सोपी पद्धत व थोडी मेहनत आपल्या स्तरावर आपण का करू शकत नाही? एक- दोन उदाहरणे वाईट घडतातच! माणूस असो की प्राणी या घटना कधी चुकल्या नाहीत,पण आपण दृष्टिकोनच कलुषित ठेवत असू तर सुधारणा होण्यापेक्षा अधोगतीच अधिक होईल.

जमलं तर तुमच्या दृष्टिकोनाला एक नवा ‘फिनिशिंग टच’ द्या! आणि वाईटाला एक्झिट! बस एवढंच आजच्या लेखाच्या निमित्ताने सांगू शकतो.

दृष्टिकोनाची एक पेन होती

त्याची शाई सेम होती..

गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या समाजाला

फसविणारी ती गेम होती…

चांगले पाहून लोकांना सांगा..

वाईटाचा प्रचार आतातरी थांबवा..

काही जमत असेल जर तुम्हाला

तुमच्या दृष्टिकोनाची झालर लांब कमी

पण सोनेरी लावा……

✒️लेखक- अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो:-8806721206