मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू या!

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून शतकोत्तर रौप्य महोत्सव उलटला आहे. इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृतीची उघड उघड विटंबना होत होती. इंग्रजांच्या दमणशाही विरुद्ध तरुण एकत्र यायला तयार नव्हते. तरुणांना एकत्र आणल्याशिवाय इंग्रजांविरुद्ध लढा देणे अशक्य आहे हे ओळखून त्यांनी तरुणांना एकत्र आणण्यासाठी व त्यांच्याच देशभक्तीची मशाल पेटवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राची परंपरा बनली. आजही ती परंपरा महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने जोपासली जाते. आज गणेश चतुर्थी, बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचे आज आगमन होत आहे. गणेशोत्सव ही महाराष्ट्राची ओळख आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सजरात केला जातो. दहा दिवस सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.

पण गेल्या दोन वर्षांपासून हे चित्र बदलले आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाची छाया आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता गणेशोत्सवात अनावश्यक जल्लोष टाळून, गर्दीला लगाम घालत मर्यादित स्वरूपातच साजरा करावा लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजून संपलेली त्यातच तिसरी लाट केंव्हाही येऊ शकते असे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहे. काहींसाठी ही मार्गदर्शक तत्वे पाळणे जिकरीचे ठरणार आहे; असे असले तरी सर्वांना ही मार्गदर्शक तत्वे सर्वांना पाळावीच लागणार आहे. प्रश्न जनतेच्या आरोग्याचा आहे. त्यात थोडीजरी बेफिकीरी केली तरी ती अंगलट येऊ शकते.

दुसऱ्या लाटेचा अनुभव आपण घेतला आहे तो किती भयावह होता हे आपण पहिलेच आहे त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर गणेश भक्तांना सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावेच लागेल. एकदा का कोरोनाचे हे विघ्न नाहीसे झाले की पुन्हा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता येईल. सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनही गणेशोत्सव साजरा होऊ शकतो. यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करतानाच तो पर्यावरण पुरक असावा याचीही काळजी सर्वानी घ्यावी. गणेशोत्सवाची सजावट सात्विक असावी. यात गणेश तत्व आकर्षित करणारे साहित्य, फळे, फुले, दुर्वा, पत्री, नैसर्गिक फळा, दुर्वांचा वापर आदी सर्वकाही पर्यावरण पुरकच असावे. प्लास्टिक, प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल यांचा वापर कटाक्षाने टाळावा. पर्यावरणास हानी होईल अशा कोणत्याच साहित्याचा वापर या गणेशोत्सवात करू नये. श्रींची मूर्तीही शाडूचीच असावी.

गणेशोत्सव म्हणजे एकप्रकारे निसर्गाचे संवर्धन व पूजन होय त्यामुळेच सर्वत्र नैसर्गिकतेचा आविष्कार हवा. श्री गणेशाची कृपा सर्व भक्तांवर होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे म्हणजे या निसर्ग देवतेचा मान राखून अत्यंत सात्विकतेने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक, प्रदूषण मुक्त व सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून भावपूर्ण वातावरणात साजरा करु या!

गणपती बाप्पा मोरया!!!

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED