शिक्षणाची दारे उघडा

आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो .तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे .कारण शिक्षणाशिवाय आपल्याला मा-यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत आणि जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करीत नाही तोपर्यंत खरीखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवी समाजाला नवे आत्मभान देणारे सशक्त माध्यम म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाशिवाय माणसाला तरणोपाय नाही. शिक्षण हे उदरनिर्वाहाचे साधन नसून व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणारे महा ऊर्जावान शस्त्र आहे. हजारो वर्षापासून भारतीय बहुसंख्य समाज शिक्षणाच्या बंदीने गुलामीचं जीवन जगत होता. आपले माणूसपण हरवून बसला होता .परिवर्तनाचा सारा प्रकाशच बंदिस्त केला होता .पण ब्रिटिश साम्राज्यातील शिक्षण क्रांतीने तसेच महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमाने बहुजनाला नवी प्रेरणा दिली .सनातनी व्यवस्थेचे वास्तव समजून घेऊन भारतीय समाजाच्या गुलामीचे कारण ब्राह्मणी ग्रंथातील कपटीनीती आहे. हे ओळखून त्यांनी स्वतःला शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी झोकून दिले. त्यांच्या शिक्षण क्रांतीने समाजात नवे स्फुल्लींग चेतले .नवा शैक्षणिक आकृतिबंध तयार झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञान क्रांतीने देशाला नवे ज्ञानशस्त्र मिळाले. संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे, मुक्त व अनिवार्य शिक्षण सर्वांना देणे या हक्कामुळे शिक्षणात काहीप्रमाणात देशाने प्रगती केली.

पण कोरोना महामारीच्या काळापासून शिक्षणाची दारे बंद झाली. ऑनलाईन नावाच्या गोंडस नावाखाली मोबाईल कंपन्यानी नवा फंडा काढला .सरकारने सारे व्यवहार व शिक्षण ऑनलाईन सुरू केल्याने सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. खेड्यातील व शहरातील लाखो गरीब मुलांना शिक्षणाच्या बंदिस्त वाटेनं होरपळून काढले आहे .

आज महाराष्ट्रात मंदिर उघडण्यासाठी आंदोलने सुरू आहेत .अनेक उत्सवासाठी परवानगी मिळवण्यासाठी नेते खटाटोप करत आहेत. पण शिक्षणाची दारे उघडावी यासाठी कोणतेही आंदोलन करत नाही. शिक्षणाने एक पिढी बरबाद होत असताना सरकारने आता तरी शिक्षणाची दारे उघडावे. नाहीतर देशातील येणारे भविष्य अंधकारमय होईल .

आज लोकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे ग्रामीण व शहरी भागातील गरीब मुलांना आर्थिक तजवीजसाठी पालकांना मदत करण्यासाठी कामाला जावे लागते. त्यामुळे ज्या वयात हातात पेन्सिल व पुस्तक असायला हवं त्या काळात त्यांच्या हातामध्ये मजुरीचे शस्त्र देण्यात आलं .आज लोकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शिक्षण घेतल्याने नोकरी लागत नाही तर शिक्षण का घ्यायचा असे उदास वातावरण देशात पाहायला मिळत आहे.ही विचारक्रिया अत्यंत घातक आहे.श्रीमंत वर्गाचे विद्यार्थ्यी नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. पण आज बहुसंख्य गरीब जनता एक वेळच्या जेवनाला मोताद आहे. कोरोना काळात रोजगार गेल्याने पालकांना विद्यार्थ्यांना कसं शिकवावं हा प्रश्न पडला आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे नवे दालन आहे त्याला बंदिस्त ठेवून आपण मुलांचा शैक्षणिक, सामाजिक ,मानसिक,बौध्दिक,व भावनिक विकास खुंटवत आहोत. त्यांच्या पंखांचे बोन्साय करत आहोत.हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणून शासनाने आतातरी शिक्षणाची दारे उघडून विद्यार्थ्यांना शालेय ऑफलाईन शिक्षणाच्या वाटा उघड्या कराव्या . भविष्यातील विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. जेणे करून विद्यार्थी हे देशाचे नवे आधारस्तंभ होतील. साऱ्या विद्यार्थ्यांना नवे सैंवधानिक शिक्षण देऊन शिक्षणाचा नवा अविष्कार घडवावा असे वाटते.

“शिक्षण घेऊ बनवू शहाणे
जाणून घेऊ अधिकार आपले अज्ञानाला दूर सारून
दीप लावूया ज्ञानाचा
दीप लावूया ज्ञानाचा….”

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED